दीपिका पदुकोणची एनसीबीकडून तब्बल ५ तास चौकशी, धर्मा प्रॉडक्शनच्या क्षितिज प्रसादला अटक

 

स्थैर्य, मुंबई, दि.२६: सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी तपास करत असलेल्या एनसीबीकडून (अमली पदार्थ नियंत्रक विभाग) गेल्या २ दिवसांपासून करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचा कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसादची चौकशी केली जात होती. या पथकाकडून क्षितिज प्रसादच्या मुंबईतील वर्सोवा, अंधेरी स्थित घरावर छापा सुद्धा मारण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी क्षितिज प्रसादला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. क्षितिज प्रसाद याची चौकशी केल्यानंतर त्यास एनसीबीने अटक केली आहे. दरम्यान, एनसीबीने शनिवारी दीपिका पदुकोणची तब्बल ५ तास चौकशी केली.

क्षितिज प्रसादच्या चौकशीत त्याने मान्य केले आहे की, त्याचे संबंध अमली पदार्थांची तस्करी करणा-या अंकुश अरेंजासोबत होते. क्षितिज प्रसादच्या मुंबईतील व दिल्लीतील घरी असलेल्या पार्ट्यांत अंकुश अरेंजा सुद्धा हजर राहायचा. एनसीबीने अंकुश अरेंजालाही अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी अटक केली आहे.

सुशांतसिंह राजपूत हा १४ जून रोजी वांद्रे येथील आपल्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूनंतर अमली पदार्थ प्रकरण पुढे आले आहे. ड्रग्ज प्रकरणात काही ड्रग्ज पेडलरने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे आपले जबाब दिले. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेकांची नावे समोर आली आहेत.

दीपिकाची समोरासमोर चौकशी

सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील अमली प्रदार्थ संबंधात एनसीबीकडून (अमली पदार्थ नियंत्रक विभाग) आज दीपिका पदुकोणची तब्बल ५ तासाहून अधिक चौकशी झाली. दीपिका पदुकोण व तिची मॅनेजर करिष्मा प्रसाद या दोघींचीही समोरासमोर बसून चौकशी करण्यात आलेली आहे. दीपिकाच्या उत्तरांवर एनसीबी असमाधानी असल्याची माहिती आहे. चौकशीदरम्यान एनसीबीने दीपिकाचा फोन जप्त केल्याची माहिती आहे.

चौकशीदरम्यान, २०१७ साली दीपिका पदुकोण व तिची मॅनेजर करिष्मा यांच्यादरम्यान झालेल्या व्हाट्सअप चॅट बद्दल काही प्रश्न दीपिका पदुकोण व करिश्मा या दोघांना विचारण्यात आले. या व्हॉट्सअ‍ॅप मध्ये दीपिका पादुकोण हिने अमली पदार्थांची मागणी केली होती? आणि त्याबद्दल पुढे काय झाले? अशा प्रकारचे बरेच प्रश्न एनसीबीकडून दीपिका पदुकोणला विचारण्यात आले.

सुशांतसिंह ड्रग्ज घेत होता, श्रद्धा कपूरनंतर साराकडून कबुली

बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणी अभिनेत्री सारा अली खानची देखील चौकशी करण्यात आली. श्रद्धा कपूरनंतर साराने देखील सुशांत ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली आहे. सुशांतसिंह राजपूतशी केदारनाथच्या शुटींग दरम्यान जवळीक निर्माण झाली होती. सुशांत लोणावळ्याला फार्म हाऊसवर विडी ओढायचा अशी कबुली साराने दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सारा अली खान हिने ड्रग्ज घेतल्याचा आरोप फेटाळून लावला. कोणत्याही ड्रग्ज पेडरलला ओळखत नाही, असे चौकशी दरम्यान साराने एनसीबी अधिका-यांना सांगितले.

आपण काही काळ सिगारेट ओढली, पण कधीही ड्रग्ज घेतलेले नाही. सुशांत लोणावळ्याला फार्म हाऊसवर विडी ओढायचा, असे साराने चौकशीत सांगितले. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज घेत होता अशी कबुली श्रद्धा कपूरने दिली. कधी सेटवर तर कधी व्हॅनिटी व्हॅनमध्ये सुशांत ड्रग्ज घेत होता, असे श्रद्धा कपूरने एनसीबीला सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya