व्हॉट्सअ‍ॅपवरील व्हिडिओ कॉलिंग व्हायरल करण्याची धमकी देत 60 लाख रुपये खंडणीची मागणी

 


स्थर्य, सातारा, दि. 26 : सातार्‍यातील एका हॉस्पिटलच्या डॉक्टरांना व्हॉट्सअ‍ॅपवर रेकॉर्डिंग केलेले व्हिडिओ कॉलिंग व्हायरल करण्याची धमकी देत 60 लाख रुपये खंडणीची मागणी केली. खंडणीपोटी 12 लाख रुपये वसूल करून देखील डॉक्टरांना पुन्हा उर्वरित पैशासाठी सातत्याने त्रास देणार्‍या दोन महिला व एका अल्पवयीन मुलीला शाहूपुरी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या महिलांनी खंडणीच्या पैशातून खरेदी केलेले 11 लाख 95 हजार रुपयांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले असून या महिलांना 29 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्राची उर्फ श्रद्धा अनिल गायकवाड (वय 35) आणि पूनम संजय पाटील (वय 35) दोघेही रा. सोमवार पेठ, सातारा अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  तक्रारदार डॉक्टर यांनी दि. 25 रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तीन महिला, एका महिलेकडे  असलेल्या व्हॉटसअ‍ॅप व्हिडिओ कॉलवरून वेळीवेळी करून ठेवलेले रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची, पोलिसांकडे तक्रार देण्याची, बदनामी करण्याची, मोर्चा काढण्याची धमकी देऊन  60 लाख रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार दिली होती.

दरम्यान, संबंधित डॉक्टराने भीतीपोटी त्या महिलांना  दि.5 ऑगस्ट रोजी 12 लाख रुपये रोख  दिले असल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार या तीन महिलांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हा दाखल होताच जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहा.पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तपासाबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार स.पो.नि. विशाल वायकर, स.पो.नि. संदीप शितोळे, पो. हे. कॉ.घाडगे, श्रीनिवास देशमुख, सतीश बाबर, सुनील भोसले,अमित माने, ओंंकार यादव, मनोहर वाघमळे, म.पो.ना. गायकवाड, वैशाली गुरव, पंकजा जाधव यांनी दोन पंचांच्या समक्ष कारवाईसाठी आवश्यक असणारी सर्व साधनसामग्री उपलब्ध करून फिर्यादी यांना आरोपी महिलेस फोन करण्यास सांगितले.

याप्रमाणे फोन केला असता आरोपी महिलेने फिर्यादी डॉक्टर यांना खंडणी मागत काही वेळातच ती पैसे घेण्यास येत असल्याचे सांगितले. पोलिसांनी छापा कारवाईचे नियोजन करून  सोबत आणलेल्या 1 लाख रुपयांच्या नोटा देण्यासाठी फिर्यादी यांना पाठविल्या. पोलीस निरीक्षक विशाल वायकर व कर्मचारी महिलांनी, ज्या ठिकाणी खंडणी घेण्यास येणार होत्या तेथे सापळा रचला. काही वेळात तीन महिला त्या ठिकाणी आल्या. त्यांनी फिर्यादीकडून पैसे स्वीकारल्यानंतर पूर्वनियोजित इशारा केला. पोलिसांनी सोबत असलेल्या महिला कर्मचार्‍यांच्या मदतीने दोन महिलांसह अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून फिर्यादीने  दिलेले 1 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोन महिलांसह एका अल्पवयीन मुलीला अटक केली असून आरोपी महिलांनी फिर्यादीकडून यापूर्वी घेतलेल्या 12 लाख  रुपयांच्या खंडणीतून खरेदी केलेले 11 लाख 95 हजार रुपये किंंमतीचे सोन्या- चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत. यातील एकाअल्पवयीन मुलीला नातेवाइकांच्या समक्ष तपासकामी ताब्यात घेण्यात आले आहे. अटक केलेल्या दोन महिलांना 29 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. विशाल वायकर करत आहेत.Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya