सुशांतच्या व्हिसेरा चाचणीवरून वाद : मुंबई फॉरेन्सिक टीमने अभिनेत्याच्या व्हिसेराची ड्रग टेस्ट केली नाही, एम्सच्या तपासणीनंतर निष्काळजीपणा आला समोर

 


स्थैर्य, मुंबई, दि.३०: मंगळवारी एम्सने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा व्हिसेरा अहवाल सीबीआयकडे सादर केला. यावेळी पॅनेलने मुंबई फोरेन्सिक लॅबने केलेल्या घोर दुर्लक्षाकडे लक्ष वेधले. त्यांच्या मते प्रयोगशाळेने अनेक आवश्यक चाचण्या केल्या नाहीत. यातील एक चाचणी होती, ज्याद्वारे सुशांतला ड्रग्ज देण्यात आले होते की नाही? हे समजू शकले असते. 

जबरदस्तीने ड्रग्ज दिल्याचा कुटुंबाचा आरोप 

निष्काळजीपणा समोर आल्यानंतर सुशांतच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, कदाचित त्याला जबरदस्तीने ड्रग्ज दिले गेले असावेत. आता सीबीआय हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहे की, मुंबईच्या फोरेन्सिक लॅबने व्हिसेराच्या चाचणीत असे दुर्लक्ष का केले?

आत्महत्या की हत्या? अद्याप स्पष्ट झालेले नाही

एम्सच्या 5 डॉक्टरांच्या टीमचे नेतृत्व करणारे डॉ. सुधीर गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आणि सीबीआयने या प्रकरणात एकत्र काम केले आहे. परंतु अद्याप काही गोष्टींवर चर्चा होणे आवश्यक आहे. गुप्तांच्या म्हणण्यानुसार, हे खरे आहे की सुशांतच्या शरीरात विषाचा अंश सापडला नाही. पण तरीही सुशांतने आत्महत्या केली की त्याला मारण्यात आले हे स्पष्टपणे सांगता येत नाही.

1 जुलै रोजी आला होता मुंबई एफएसएलचा रिपोर्ट 

1 जुलै रोजी मुंबई पोलिसांनी सुशांतच्या व्हिसेरा तपासणीचा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये फॉरेन्सिक लॅबने असे म्हटले होते की, अभिनेताच्या शरीरात कोणतेही विष किंवा संशयास्पद रसायन सापडले नाही. सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यानंतर गुदमरल्यामुळे झाला असा दावाही अहवालात करण्यात आला आहे.

सीबीआय वेळ का घेत आहे?

वृत्तानुसार, सुशांत मृत सापडलेल्या खोलीत जाऊन सीबीआयने डमी टेस्ट केली होती. आता त्याच्या रिपोर्टची प्रतिक्षा आहे. अजून काही अहवाल सीबीआयला मिळालेले नाहीत. या प्रकरणातील दिरंगाईच्या प्रश्नावर सीबीआयने स्पष्टीकरण दिले की ते प्रत्येक कोनातून या प्रकरणाची चौकशी करत आहेत. याच कारणामुळे तपासाला विलंब होत आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya