राज्यसभेत गोंधळ घालणारे आठ खासदार निलंबित

 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२२: कृषि विषयक विधेयकांवरून राज्यसभेत गोंधळ घालणा-या आणि धक्काबुक्की करणा-या आठ खासदारांवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी निलंबनाची कारवाई केली. यानंतर सभागृहाचे कामकाज १०.०० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. १० वाजता सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर पुन्हा खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे कामकाज पुन्हा अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले.

कृषि विषयक विधेयकांवरून रविवारी राज्यसभेत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला होता. या गोंधळावर सभापती व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त करत या घटनेची निंदा केली. उपसभापती हरिवंश यांच्यासमोर गैरवर्तन केल्याबद्दल सभापती व्यंकय्या नायडू यांनी आठ खासदारांना एका आठवड्यासाठी सदनाच्या कामकाजातून निलंबित केले आहे.


निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांचाही समावेश आहे. याशिवाय राजू सातव, के के रागेश, रिपून बोरा, डोला सेन, सय्यद नझीर हुसैन आणि एलामारन करिम यांचाही समावेश आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या सातव्या दिवशी राज्यसभेत कृषि विधेयकांवर चर्चा आणि मतदान सुरू असताना विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. विधेयकं संमत करून घेण्यासाठी उपसभापतींनी राज्यसभेचं कामकाजाची वेळ वाढवली. यावर, उपसभापतींच्या निर्णयावर खासदारांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहात तोडफोडही केली. खासदारांनी सभागृहातच नियम पुस्तिका फाडली तसेच माईकही तोडण्यात आला. ‘विधेयकांवर चर्चा सरकारला नकोय. त्यांना केवळ लवकरात लवकर ही विधेयके मंजूर करायची आहेत. ही विधेयके आणण्यापूर्वी विरोधकांशी संवाद साधणे गरजेचे होते. कोरोनाच्या नावावर अध्यादेश काढले गेले. सरकारने भारतीय मजूर संघालाही विश्वासात घेतलेले नाही, असा आरोप विरोधी खासदारांकडून करण्यात आला. या गोंधळातच आवाजी मतदानाद्वारे कृषि विषयक दोन विधेयके मंजूर करण्यात आली.

उपसभापतींवरील अविश्वासदर्शक ठराव नियमबाह्य

विरोधकांचा विरोध असतानाही, आवाजी मतदानाच्या जोरावर उपसभापतींनी रविवारी शेतकरी विधेयके पारित केली होती. त्यामुळे, त्यांच्यावर अविश्वासदर्शक ठराव मांडण्याचा विचार विरोधक करत होते. मात्र, असे करणे हे नियमबाह्य असल्याचे राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडूंनी स्पष्ट केले.