नाणेगाव पुलाची अभियंत्यांकडून पाहणी

 


स्थैर्य, कराड, दि. २१ : चाफळ विभागातील नाणेगाव खुर्द ते चव्हाणवाडी या जिल्हा ग्रामीण मार्ग 118 या रस्त्यावर नाणेगाव खुर्द गावात जाण्यासाठी असलेल्या पुलाच्या दुरुस्तीबाबतचे खा. श्रीनिवास पाटील यांचे आदेश प्राप्त होताच तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन. डी. भोसले यांनी  पुलाची पाहणी करत मोजमापे घेतली. यावेळी सरपंच विक्रम कुंभार, अक्षय लोहार, योगेश पाटील, संतोष पाटील, सचिन पाटील यांची उपस्थिती होती.


गतवर्षी झालेल्या अति-वृष्टीमुळे नाणेगाव खुर्द येथील पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी पुलावरून वाहिल्याने पुलाचे दोन्ही बाजूचे लोखंडी रेलिंग वाहून गेले आहे तर पुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने पुलावरून जाताना वाहनधारकांना तसेच नागरिकांना कसरत करावी लागत आहे. या पुलाच्या दुरुस्तीकडे एक वर्षांनंतरही कोणीच लक्ष दिले नव्हते. खा. श्रीनिवास पाटील यांनी याची दखल घेत पुलाच्या मजबुतीकरण व दुरुस्तीचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन. डी. भोसले यांना  नाणेगाव येथे येवून सदर पुलाची पाहणी करीत मोजमापे घेतली. सदर पुलाच्या दुरुस्ती व मजबुतीकरण साठीचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांना पाठविण्यात येणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.