अखेर चौथा मृतदेह सापडला

 


स्थैर्य, मेढा, दि. 23 : जावली तालुक्यातील मार्ली घाटात खून करून मृतावस्थेत टाकलेल्या पती-पत्नीच्या प्रकरणाने खळबळ उडाल्यानंतर मेढा पोलिसांची चक्रे वार्‍यासारखी वाहू लागली होती. संशयित आरोपी ताब्यात घेतला असता त्याने आणखी दोन खुनांची कबुली दिली होती. त्यापैकी एक सोमवारी शोधण्यात आला. त्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीम व महाबळेश्‍वर अ‍ॅडव्हेंचर यांनी प्रयत्न करून अखेर चौथा मृतदेह शोधण्यात यश मिळविले.


या प्रकरणी पोलिसांनी योगेश निकम, रा. सोमर्डी, ता. जावली या संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याने चौघांच्या खुनाची कबुली दिली. सोमवारी चौथा मृतदेह शोधण्यास अंधार पडल्याने शोधकार्य थांवविण्यात आले होते. मंगळवारी सकाळी पुन्हा शोधकार्यास  सुरुवात केली. संशयित आरोपी योगेश निकम याने दाखविलेल्या जागेपासून काही अंतराच्या परिसरात वेगवेगळे पडलेले अवशेष गोळा करण्यात आले. मृतदेह जनावरांनी अस्ताव्यस्त केला असल्याचे दिसून येत होते. दुपारी 12 पर्यंत शोधमोहीम पूर्ण करण्यात आली. मृत कुटुंब सांगली जिल्ह्यातील बामणोलीचे असून घटनेच्या नेमक्या कारणाचा पोलीस शोध घेत असले तरी पैशाच्या हव्यासापोटीच नराधमाने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा कयास आहे. तानाजी विठोबा जाधव (वय-55), पत्नी सौ. मंदाकिनी जाधव (वय-50), मोठा मुलगा तुषार जाधव (वय -26) व छोटा मुलगा विशाल जाधव (वय- 20) अशी खून झालेल्या चौघांची नावे आहेत. हे सर्वजण दत्तनगर, बामणोली, ता. मिरज, जि. सांगली येथील राहणारे आहेत.


मेढा-दिवदेव-भिलार या मार्गावर मार्ली घाट लागतो. सुमारे 28 कि.मी. घाट असून हा संपूर्ण मार्ग सुनसान आहे. या मार्गावर अत्यंत कमी प्रमाणात वाहतूक असते. दिवसभरात एखादे-दुसरेच वाहन या घाटातून जाते. दि. 11 ऑगस्ट रोजी पोलिसांना एक मृतदेह या घाटात आढळला होता. त्यानंतर याच मार्ली घाटात शनिवारी आणखी एक अनोळखी महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. हे मृतदेह पती-पत्नीचे असल्याचे रविवारी पोलीस तपासात निष्पन्न झाले. दरम्यान पोलीस तपासात या दोघांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सोमवारी या प्रकरणाचे आणखी गूढ वाढले. पोलिसांनी या प्रकरणी सोमवारी सोमर्डी, ता. जावली येथील योगेश निकम या युवकाला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने दिलेल्या कबुलीजबाबामुळे पोलिसांचे डोकेही चक्रावले. या संशयिताने पती-पत्नीच्या खुनासह त्यांच्या दोन्ही मुलांना संपवल्याचीही कबुली दिली. कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात या चौघांचीही बेपत्ता केस दाखल असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पती-पत्नीचे मृतदेह सापडल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांना मेढा पोलीस ठाण्यात ओळख पटवण्यासाठी बोलवले असता त्यांनी मृत व्यक्ती त्यांच्याच नात्यातील असल्याचे सांगितले आहे.


संशयित योगेश याची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. त्याने दोन मुलांचाही खून केल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांचे मृतदेह शोधण्याची मोहीम सोमवारी दुपारपासून हाती घेतली. त्यानुसार संशयित योगेशला घटनास्थळी मार्ली घाटात नेण्यात आले. सोमवारी सायंकाळी एका मुलाचा मृतदेह सापडला. संशयिताने हा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. त्यामुळे पोलीसही हडबडून गेले आहेत. तुषार व विशाल या मुलांना मिल्ट्रीमध्ये भरती लावतो असे संशयित योगेश निकमने सांगितले होते. त्यानुसार या मुलांना संशयिताने सातारला बोलावले. तेथून त्यांना मार्ली घाटात मिल्ट्रीचे ट्रेनिंग सेंटर असून तेथे आपल्याला जायचे आहे असे सांगून नेले. तेथे नेल्यानंतर या दोघांना गुंगीचे औषध देवून उंच कड्यावरून ढकलून दिल्याची कबुली संशयिताने दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. संशयिताने दोन्ही मुलांना संपवल्यानंतर या मुलांच्याच मोबाईलवरून त्यांच्या आई-वडिलांशी संपर्क साधला व त्यांनाही मुलांचे ट्रेनिंग सेंटर पाहण्यासाठी सातारला बोलावून घेतले. तेथून त्यांना मार्ली घाटात नेवून, गुंगीचे औषध देत त्यांचाही या संशयिताने खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून तपासासाठी सहकार्र्‍यांना सूचना केल्या. कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष चामे, शिर्के, डी. डी. शिंदे अधिक तपास करत आहेत.


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya