मृत कामगाराला आर्थिक मदत न करता आर्थिक गैरव्यवहारजरंडेश्‍वर साखर कामगार संघाच्या दोन पदाधिकार्‍यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

 

     
स्थैर्य, कोरेगाव, दि.२२: जरंडेश्‍वर शुगर मिल्समधील मृत कामगाराच्या कुटुंबियांना आर्थिक मदत न करता, त्याच्या नावे कारखान्याकडून जमा झालेल्या रकमेतून २ लाख २० हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी जरंडेश्‍वर साखर कामगार संघाचे उपाध्यक्ष आदिनाथ अनभुले व सरचिटणीस दुष्यंत शिंदे यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
 
पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, जरंडेश्‍वर शुगर मिल्सच्या उत्पादन विभागामध्ये पॅनमन म्हणून संजय गणपत कदम हे काम करत होते, अल्पशा आजाराने त्यांचे जानेवारी २०२० मध्ये निधन झाले होते. कदम यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी जरंडेश्‍वर साखर कामगार संघाने कारखान्याकडे कामगारांचा एक दिवसाचा पगार कपात करुन देण्याची विनंती एका पत्राद्वारे केली होती. 

त्यानुसार कारखान्याचे सरव्यवस्थापक विजय जगदाळे यांनी दि. ७ मार्च २०२० रोजी कामगारांच्या एका दिवसाच्या पगाराची रक्कम ४ लाख २९ हजार १३६ रुपये कपात करुन, तसा धनादेश जरंडेश्‍वर साखर कामगार संघाच्या नावे दिला. धनादेश कामगार संघाच्या आयडीबीआय बँकेच्या कोरेगाव शाखेतील खात्यामध्ये जमा झाल्यानंतर देखील कदम यांच्या कुटुंबियांना दिली नाही. 

मृत कामगार संजय कदम यांचे वडील गणपत नामदेव कदम यांनी दि. २३ जुलै २०२० रोजी कारखान्याचे सरव्यवस्थापक विजय जगदाळे यांच्याकडे तक्रारी अर्ज देऊन कामगारांच्या एका दिवसाच्या पगाराची रक्कम ४ लाख २९ हजार १३६ रुपये कपात करुन घेऊन देखील ती कुटुंबियांना दिली नसल्याची तक्रार दिली होती. कदम यांच्या वडिलांची तक्रार येताच, कारखाना कामगार संघाने बनावट पत्र तयार करुन, त्यावर शुगर मिल्सच्या बारनिशीमधील आवक रजिष्टरचा शिक्का घेतला आणि ते पत्र कामगारांच्या व्हॉट्सअपरवर व्हायरल केले. 

कामगार संघाने या पत्रावर दि. २० मार्च २०२० ही खोटी तारीख देखील घातली. या पत्रामध्ये पॅनमन संजय कदम यांनी मृत्यु होण्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि तो शुगर मिल्स व्यवस्थापनाने मान्य देखील केला होता, अशी माहिती आहे. त्यामुळे कदम यांच्या नावे कामगारांचा एक दिवसांचा पगार कपात केला असला तरी तो कदम यांच्या कुटुंबियांना न देता टेलिफोन ऑपरेटर विभागातील मृत कर्मचारी विश्‍वजित काकासाहेब बर्गे यांच्या कुटुंबियांना दिली जाणार असल्याचे नमूद केले होते. 

दि. ११ ऑगस्ट २०२० रोजी कामगार संघाचे सहसचिव राजेंद्र गोरखनाथ फंड याने आयडीबीआय बँकेच्या कोरेगाव शाखेतील कामगार संघाच्या बँक खात्यातून रोख स्वरुपात २ लाख २० हजार रुपये काढले. त्याने ही रक्कम कदम अथवा बर्गे या कामगारांच्या कुटुंबियांना दिलीच नाही. त्यावेळी बँक खात्यामध्ये २ लाख ७१ हजार रुपये शिल्लक राहिले होते. 

त्याचदरम्यान दि. १० सप्टेंबर २०२० रोजी कारखान्यातील १६६ कायम कामगारांनी युनियनने केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराबद्दल व्यवस्थापनाकडे लेखी तक्रार दाखल केली. कामगारांची तक्रार येताच आणि कामगार संघाने केलेल्या व्हायरल पत्राची शुगर मिल्स व्यवस्थापनाने शहनिशा केल्यावर ते पत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी बारनिशी विभागातील आवक-जावक लिपिकाकडून रितसर खुलासा घेतला. संबंधित लिपिकाने ज्या दिवशी पत्र आवक झाल्याचे दर्शवित आहे, त्या दिवशी मी कामावर नव्हतो, मी रजेवर होतो. या पत्रावर माझी स्वाक्षरी नाही, ते पत्र आवक झालेले नाही, असे स्पष्ट ेकेले. 

त्यानंतर कारखान्याचे सरव्यवस्थापक विजय जगदाळे यांनी दि. १५ सप्टेंबर २०२० रोजी कोरेगाव पोलीस ठाण्यात जरंडेश्‍वर साखर कामगार संघाचे उपाध्यक्ष आदिनाथ अनभुले व सरचिटणीस दुष्यंत शिंदे यांच्या विरोधात तक्रार दिली, त्यानुसार रितसर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत अनभुले व शिंदे यांना तात्काळ अटक करण्यात आली. कोरेगाव न्यायालयाने आदिनाथ अनभुले व दुष्यंत शिंदे यांना दि. २० सप्टेंबर २०२० पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. या गुन्ह्याचा तपास सुरु झाल्याचे समजताच फंड याने दि. १८ सप्टेंबर २०२० रोजी आयडीबीआय बँकेच्या कोरेगाव शाखेतील कामगार संघाच्या बँक खात्यामध्ये २ लाख २० हजार रुपये रोख स्वरुपात जमा करत बँक खात्यामध्ये शिल्लक रक्कम व्यवस्थित केली होती. त्यानंतर गुन्ह्याची व्याप्ती पाहता, न्यायालयाने पुन्हा तीन दिवसांची म्हणजेच दि. २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली होती. 


कामगार संघाचे कार्यालय व बँक खाते पोलिसांकडून सील

जरंडेश्‍वर साखर कामगार संघाचे कार्यालय असलेले राजेंद्र गोरखनाथ फंड याचे निवासस्थान व आयडीबीआय बँकेच्या कोरेगाव शाखेतील कामगार संघाचे खाते पोलिसांनी सील केले आहे. बँक खात्याचा संपूर्ण तपशील पोलिसांनी काढला असून, त्यादृष्टीने तपास केला जात असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी सांगितले. 


सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांना देखील मदत केली नाही

जरंडेश्‍वर साखर कामगार संघाने गेल्यावर्षी सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने झालेल्या नुकसानीमध्ये मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करण्यासाठी गेल्यावर्षी एक दिवसाचा पगार म्हणून ३ लाख रुपयांची कपात करुन घेत बँक खात्यावर जमा करुन घेतली, मात्र ती पूरग्रस्तांना अद्याप दिली नसल्याची तक्रार कारखान्याच्या १६६ कायम कामगारांनी सरव्यवस्थापक विजय जगदाळे यांच्याकडे दि. १० सप्टेंबर २०२० रोजी केली आहे. या तक्रारीचे पत्र देखील कोरेगाव पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. पोलीस देखील या विषयाचा तपास करत आहेत.