मराठा आरक्षणावरील स्थगितीनंतर प्रथम वर्ष पदवी प्रवेश रद्द

 

स्थैर्य, मुंबई, दि.१३: शिक्षण आणि नोकºयांमधील मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर प्रथम वर्ष पदवीचे प्रवेश रद्द करून सर्व प्रक्रिया नव्याने राबवण्याचे आदेश राज्य सरकारकडून विद्यापीठांना देण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टाने बुधवारी निर्णय देताना या आरक्षणाचा आधीच मिळालेला लाभ अबाधित राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. हे प्रकरण अधिक न्यायाधीशांच्या पीठाकडे वर्ग करण्यात येणार असल्याचेही सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.

मराठा आरक्षणास तूर्त स्थगिती देताना पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या झालेल्या प्रवेशांमध्ये बदल करू नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशांमध्ये बदल होणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. अद्याप प्रवेश प्रक्रिया न झालेल्या वैद्यकीय आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेत यंदा आरक्षण लागू होणार नाही. पण राज्यातील बहुतेक विद्यापीठांच्या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या पदवीची प्रवेश प्रक्रिया झाली आहे, तर अकरावी, पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. त्यात आरक्षण लागू होणार की नाही, याबाबत संदिग्धता होती.

अकरावीची दुसरी प्रवेश यादी गुरुवारी जाहीर होणारी, पण ती स्थगित करण्यात आली. शासन निर्णयानंतर पुढील यादीबाबत कळविण्यात येईल, असे शिक्षण विभागाने जाहीर केले होते. प्रथम वर्ष पदवीचे प्रवेश रद्द करण्याच्या सूचनांनंतर अकरावी प्रवेशाचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Previous Post Next Post