माजी संरक्षण मंत्री जसवंत सिंह यांचं निधन

 


स्थैर्य, नवी दिल्ली, दि. २७ : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये जसवंत सिंह यांनी परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि अर्थमंत्रालयाची धुरा सांभाळली होती. भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते.


जसवंत सिंह यांना भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. जसवंत सिंह यांच्यासोबतच्या चर्चा, त्यांनी भाजप पक्षासाठी केलेलं काम, हे सर्व लक्षात राहील, असं मोदी म्हणाले.


संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही जसवंत सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजस्थानमध्ये भाजपचा विस्तार करण्यासाठी त्यांनी मोठं योगदान दिल्याचं राजनाथ सिंह म्हणाले.


भाजपचे संस्थापक सदस्य राहिलेल्या जसवंत सिंह यांनी लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात भाजपचं प्रतिनिधित्व केलं आहे. वाजपेयी सरकारमध्ये जसवंत सिंह अर्थमंत्री असतानाच स्टेट व्हॅल्यू अॅडेड टॅक्स (VAT) ची सुरुवात झाली. यामुळे राज्यांना अधिक महसूल मिळण्यास सुरुवात झाली होती.


2014 साली भाजपनं जसवंत सिंह यांना बारमेर लोकसभा मतदारसंघातून तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे अपक्ष निवडणूक लढले होते. मात्र, ते या निवडणुकीत पराभूत झाले.


त्यांचं हा निर्णय पक्षविरोधी असल्याचं सांगत त्यांना भाजपने पक्षातून काढून टाकलं होतं. त्यावेळी असे परिणाम भोगावे लागतील, याची कल्पना होती, पण पक्षाने 20 वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेल्या नेत्याला तिकीट दिलं. त्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागल्याचं जसवंत सिंह यांनी त्यावेळी म्हटलं होतं.


त्याच वर्षी म्हणजे 2014 साली घरातील बाथरूममध्ये जसवंत सिंह हे घसरून पडले होते. त्यावेळी त्यांना गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून ते कोमात होते.


Previous Post Next Post