दुर्मीळ कासवाची तस्करी करणारे टोळके जेरबंद

 


2 लाख 50 हजार रुपये किमतीचे जिवंत कासव हस्तगत


स्थैर्य, सातारा, दि.8 : दुर्मीळ कासवाची तस्करी करणारे टोळके जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे जिवंत कासव हस्तगत करण्यात आले आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील बेकायदेशीर वन्यजीवांची तस्करी करणार्‍या इसमाविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना दिल्या होत्या. दि.6 रोजी पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली,  वाठार किरोली, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत दोन इसम एका कासवाची तस्करी करत आहेत. या माहितीच्या अनुषंगाने पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या.


मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस हवालदार विनोद गायकवाड  यांनी पोलीस पथकासह वाठार गावच्या हद्दीत संशयित इसमांचा शोध घेतला असता संशयित दोन इसम हे वाठार गावच्या हद्दीत वाठार - आर्वी जाणार्‍या रस्त्याच्या कडेला असणार्‍या बेघर वस्ती पाण्याच्या टाकीजवळ हातात पिशवी घेऊन संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले. पथकाने त्यांना ताब्यात घेऊन पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे दुर्मीळ जिवंत कासव आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते कासव बेकादेशीर विकण्यासाठी फिरत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून जिवंत कासव हस्तगत करण्यात आले आहे.


कारवाईत सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, ज्योतीराम बर्गे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, पोलीस नाईक योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, प्रवीण कडव, मयूर देशमुख यांनी सहभाग घेतला.Previous Post Next Post