सरकार सुस्त; राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावे आलेली नाहीत : कोश्यारी

 

स्थैर्य, मुंबई, दि.१२: राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नावे माझ्याकडे पाठविण्याची सरकारलाच घाई नाही तर मला कसली घाई? या शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. या विलंबासाठी आपण स्वत: कुठेही जबाबदार नसल्याचेच एकप्रकारे त्यांनी स्पष्ट केले.

कोश्यारी यांच्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळास एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, ‘जनराज्यपाल भगतसिंह कोश्यारी’ या पुस्तकाचे प्रकाशन राजभवनात त्यांच्याच हस्ते झाले. या समारंभानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. राज्यपाल नियुक्त सदस्यांबाबत विचारले असता त्यांनी, ‘जब मुद्दई सुस्त, गवाह चुस्त’ अशी म्हण वापरली.

फिर्यादीला (सरकार) घाई नसेल तर गवाह (साक्षीदार) चुस्त म्हणजे सक्रिय राहून काय फायदा असे त्यांनी सूचित करीत सरकार नावे पाठविण्याबाबत दिरंगाई करीत असल्याचा ठपका ठेवला. जे नावे पाठवत नाहीत, त्यांचे आपण गुणगान कराल आणि राज्यपालांना शिव्या दिल्या तर ते चांगले वाटणार नाही. मुंबईचा मिडिया तर खूप चांगला आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली. आपल्या कार्यकाळात राजभवन विरुद्ध राज्य सरकार असे संघर्षाचे बरेच प्रसंग घडले याकडे आपण कसे बघता आणि त्यासाठी जबाबदार कोण असा प्रश्न केला असता कोश्यारी म्हणाले की, असा काही संघर्ष आहे हे मी मानत नाही. भांड्याला भांड लागतेच हेही मी मानत नाही.

राज्य सरकारच्या काही कमिटमेंट असतात आणि त्या पूर्ण करण्याचा सरकार प्रयत्न करीत असते. माझे सगळेच मित्र आहेत. विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत आता निर्णय झालेला आहे, त्यावर वाद नाही. कंगना रनौतप्रकरण सरकारने ज्या पद्धतीने हाताळले त्या बाबत आपण सरकारकडे नाराजी व्यक्त केली याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, मी कुठे तसे बोललो का? ज्यांनी छापले ते कदाचित नाराज असतील म्हणून त्यांनी तसे छापले असेल.

पवार, राऊत रागातून काही बोलले असतील

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य शासनाच्या कारभारात राज्यपाल हस्तक्षेप करतात अशी तक्रार मध्यंतरी केली होती या बाबत विचारले असता राज्यपाल म्हणाले की या दोघांपैकी जे माज्यापेक्षा मोठे आहेत ते मला आदरणीय आहेत. जे लहान आहेत ते मला पितृतुल्य मानतात. रागात,आवेशात येऊन ते काही बोलले असतील. ‘मेरी नाक मेरी जीभ को कांट दे तो मै नाक को कांट दुंगा क्या?’

रामप्रहरीच्या शपथविधीवर तुम्ही प्रहार कशाला करता? देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून राजभवनवर सकाळी शपथविधी झाला होता. पत्रकारांकडून या बाबतचा प्रश्न साहजिकच विचारला गेला. त्यावर राज्यपाल हसत म्हणाले, ‘रामप्रहर खूप शुभ मानला जातो. रामप्रहरी झालेल्या त्या शपथविधीवर तुम्ही प्रहार कशाला करता.’ राज्यपालांच्या या टिप्पणीवर एकच हशा पिकला.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya