कोरोनामुळे पत्रकाराचा मृत्यू झाल्यास शासनाने त्वरित 25 लाखांची मदत कुटुंबियांना द्यावी : रवींद्र बेडकिहाळ

माजी आमदार स्व. हरिभाऊ निंबाळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त फलटण येथे आदरांजली

स्थैर्य, फलटण : माजी आमदार स्व. हरिभाऊ निंबाळकर यांना आदरांजली अर्पण करताना ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ, अरविंद मेहता, माजी नगरसेवक हेमंत निंबाळकर, पत्रकार सुभाष भांबुरे, यशवंत खलाटे, श्रीरंग पवार, विनायक शिंदे, स. रा. मोहिते, दीपक मदने, आनंद पवार, रोहन झांझुर्णे, सुभाषराव सोनवलकर, अशोकराव सस्ते, प्रसन्न रुद्रभटे.

स्थैर्य, फलटण : सध्या देशासह राज्यामध्ये कोरोनाचे संकट वाढत आहे. नुकतेच पुणे येथील पांडुरंग रायकर व या पूर्वी लातूर येथील सूर्यवंशी या तरुण पत्रकाराचे कोरोना या आजारामुळे निधन झाले. जर कोरोना या आजारामुळे एखाद्या पत्रकाराचा मृत्यू झाला तर त्या पत्रकाराच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मदत शासनाने तातडीने द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ यांनी केली.


फलटण येथील पत्रकार भवन मध्ये माजी आमदार स्व. हरिभाऊ निंबाळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, माजी नगरसेवक हेमंत निंबाळकर, पत्रकार सुभाष भांबुरे, यशवंत खलाटे, श्रीरंग पवार, विनायक शिंदे, स. रा. मोहिते, दीपक मदने, आनंद पवार, रोहन झांझुर्णे, सुभाषराव सोनवलकर, अशोकराव सस्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी बोलताना बेडकिहाळ म्हणाले की, फलटण सारख्या ग्रामीण भागातील उमद्या पत्रकारांना घडवण्यासाठी शिवसंदेश हे वृत्तपत्र स्व. हरिभाऊ निंबाळकर यांनी सुरू केले होते. फलटणच्या पत्रकारितेचे चालते-बोलते व्यासपीठ म्हणजे शिवसंदेश होते. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज त्यांच्या बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या व फलटणकरांसाठी माजी आमदार, शिवसंदेशकार स्व. हरिभाऊ निंबाळकर हे कायम स्मरणात राहतील.


पुणे येथील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हा शासनाच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे. कोरोनामध्ये जर पुण्यासारख्या शहरात कोरोनाबाधितांना वेळेत उपचार मिळत नसतील तर ह्या सारखे दुर्दैव कोणतेही नाही. जर पत्रकारांची हि अवस्था होत आहे तर सर्वसामान्य माणसांची काय अवस्था होत असेल या बाबत अंदाजही लावला जाऊ शकत नाही. आज माजी आमदार स्व. हरिभाऊ निंबाळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवेळेस प्रमाणे पुरस्कार कार्यक्रम करू शकत नाही. तरी जे तरुण पत्रकार चांगले कार्य करतात त्यांना पुढे आणण्याचे काम सर्व जेष्ठ पत्रकारांनी केले पाहिजे, असे मत पत्रकार सुभाष भांबुरे यांनी व्यक्त केले.


प्रत्येक वर्षी माजी आमदार स्व. हरिभाऊ निंबाळकर यांचा स्मृतीदिन फलटण तालुका पत्रकार संघाच्या वतीने राज्यातील विविध पत्रकारांना पुरस्कार देऊन साजरा करण्यात येतो. परंतु या वर्षी कोरोना या महाभयंकर आजाराने संपूर्ण राज्यामध्ये थैमान घातलेले आहे. त्यामुळे या वर्षीचा कार्यक्रम फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने रहित करण्यात आलेला असून त्याऐवजी माजी आमदार स्वर्गीय निंबाळकर यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहण्यात आली.


फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार सुधीर उंडे यांचे काल निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली हि सदरील कार्यक्रमांमध्ये वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीरंग पवार यांनी केले.

Previous Post Next Post