भारत बायोटेकचे मोठे यश; ‘कोव्हॅक्सीन’ची चाचणी यशस्वी

 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१२: ‘मेड इन इंडिया’ असलेल्या भारत बायोटेक कंपनीची पहिल्या टप्प्यातील कोरोना चाचणी यशस्वीपणे पार पडली. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे ‘कोव्हॅक्सीन’ची माकडांवर चाचणी यशस्वी झाली. भारत बायोटेक कंपनीने यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. लाइव्ह व्हायरल चॅलेंज मॉडेलमध्ये माकडांवर केलेल्या प्रयोगात ही लस सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे.

भारत बायोटेक कंपनीने दिलेल्या माहितीनुसार माकडांवर केलेल्या लशीच्या प्रयोगानंतर त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्ती दिसून आली आहे. भारत बायोटेकने मकाका मुलाटा जातीच्या विशिष्ट प्रकारच्या माकडांवर ही चाचणी केली. पहिल्या टप्प्यातील कोरोनाची चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर आता दुस-या टप्प्यासाठी भारत बायोटेक कंपनीने डीसीजीआयकडे परवानगी मागितली आहे. येत्या काही दिवसांत चाचणीचा दुसरा टप्पा सुरू होईल अशी माहिती देण्यात आली आहे. भारत बायोटेक कंपनीने पहिल्या टप्प्यात १२ शहरांमध्ये कोरोना लशीची चाचणी केली. त्यामध्ये ३७५ लोकांनी सहभाग घेतला होता.

एका रिपोर्टनुसार भारत बायोटेक कंपनीने डीसीजीआयला मानवी चाचणीच्या दुस-या टप्प्याला परवानगी देण्यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. डीसीजीआयच्या डॉक्टर एस. ऐश्वर्या रेड्डी यांनी ३८० लोकांवर ही चाचणी करण्यासंदर्भात योजना सुचवली आहे. तीन चाचण्यांपैकी पहिल्या चाचणीत यश मिळाल्यानंतर दुसरा टप्पा कधी सुरू होणार याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

चाचणीसाठी भरती थांबवा, सीरम इन्स्टिट्यूटला आदेश
दुसरीकडे पुण्यातील सीरम इन्स्ट्यिूटला वैद्यकीय चाचणीसाठी भरती थांबवण्याचा आदेश भारतीय औषध नियंत्रक विभागाकडून (डीसीजीआय) देण्यात आला आहे. कोरोना लसीच्या दुस-या आणि तिस-या टप्प्यातील चाचणीसाठी पुढील आदेश येईपर्यंत नव्या स्वयंसेवकांना घेतले जाऊ नये असे डीसीजीआयने आदेशात सांगितले आहे.

दुष्परिणामांच्या संशयामुळे ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी जगभरात थांबवण्यात आली आहे. अ‍ॅस्ट्राझेन्का कंपनीने यासंबंधी अधिकृत घोषणा केली. भारतात ‘कोव्हीशिल्ड’ नावाने सीरम इन्स्टिट्यूटकडून लस उत्पादित केली जात होती. यासाठी त्यांनी चाचण्याही सुरु केल्या होत्या.
Previous Post Next Post