केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाद्वारे आयोजित केला जाणारा “हुनर हाट” ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु होणार


स्थैर्य, सातारा, दि.८: कोरोना महामारीमुळे सुमारे 6 महिन्यांच्या कालावधीनंतर 9 ऑक्टोबर, 2020 पासून “लोकल ते ग्लोबल” या संकल्पनेतून “हुनर हाट” पुन्हा सुरू होईल आणि स्वदेशी आकर्षक भारतीय खेळण्यांवर लक्ष केंद्रित करेल.

देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात स्थानिक खेळण्यांचा पारंपरिक व वडिलोपार्जित वारसा आहे असे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “स्वदेशी खेळण्याच्या” वापराच्या आवाहनानंतर नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या स्वदेशी खेळणी उद्योगाला नवचैतन्य प्राप्त झाले आहे.

लाकूड, पितळ, बांबू, काच, कपडा, कागद, चिकणमाती इत्यादींनी बनवलेल्या देशी खेळण्यांच्या विविधतेने देशाचा प्रत्येक कोपरा समृद्ध आहे असे गौरवोद्गार नक्वी यांनी काढले. स्वदेशी उत्कृष्ठ खेळणी तयार करणाऱ्या कुशल कारागीरांना बाजारपेठ आणि संधी उपलब्ध करून देणारे “हुनर हाट” हे एक अतिशय उत्तम व्यासपीठ असेल.

नक्वी म्हणाले की, “स्थानिक खेळण्यांना प्रोत्साहन देण्याच्या आवाहनानंतर” भारतीय खेळणी उद्योग पुन्हा खेळण्यांच्या बाजारामध्ये आपले वर्चस्व स्थापित करेल. ते म्हणाले की, 9 ऑक्टोबर, 2020 पासून “लोकल ते ग्लोबल” या संकल्पनेसह “हुनर हाट” पुन्हा आयोजित केले जाईल. यानंतरचा “हुनर हाट” प्रयागराज येथे 9 ते 18 ऑक्टोबर, 2020 दरम्यान आयोजित केला जाईल. देशी खेळणी तयार करणाऱ्या कारागिरांसाठी 30 टक्क्यांहून अधिक स्टॉल्स असतील. त्यांना स्वदेशी खेळण्यांच्या आकर्षक वेष्टनासाठी विविध संस्थांकडून मदत दिली जाईल.”

गेल्या 5 वर्षात 5 लाखाहून अधिक भारतीय कारागीर, हस्तकलाकार, पाककला तज्ज्ञ आणि त्यांच्याशी संबंधित इतर लोकांना रोजगार आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे “हुनर हाट” लोकप्रिय झाले आहे असे नक्वी

यांनी सांगितले. देशातील दुर्गम भागातील कारागीर व शिल्पकारांना बाजारपेठ आणि संधी उपलब्ध करून देणारे “हुनर हाट” दुर्मिळ स्वदेशी हस्तकला उत्पादनांचा विश्वासार्ह ब्रँड बनले आहे.

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने आत्तापर्यंत देशभरात दोन डझनहून अधिक “हुनर हाट” आयोजित केले आहेत जिथे लाखों कारागीर, शिल्पकार यांना या “हुनर हाट” च्या माध्यमातून रोजगार आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. आगामी काळात जयपुर (23 ऑक्टोबर -1 नोव्हेंबर 2020), चंदीगड (7- 15 नोव्हेंबर 2020), इंदूर (21 ते 29 नोव्हेंबर 2020), मुंबई (22 ते 31 डिसेंबर 2020) येथे “हुनार हाट” आयोजित केले जाईल. हैदराबाद (8 ते 17 जानेवारी 2021), लखनऊ (23 ते 31 जानेवारी 2021), इंडिया गेट, नवी दिल्ली (13 ते 21 फेब्रुवारी 2021), रांची (20 ते 28 फेब्रुवारी 2021), कोटा (5 ते 14 मार्च 2021), सूरत / अहमदाबाद (20 ते 27 मार्च 2021) इत्यादी ठिकाणी “हुनर हाट” चे आयोजन करण्यात येईल.

यावेळी लोक “हुनर हाट” उत्पादने डिजिटल व ऑनलाईन पद्धतीने खरेदी करू शकतील असे नक्वी यांनी सांगितले. केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालय या कारागीर आणि त्यांच्या देशी उत्पादनांची नोंदणी “जेएम” (गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस) वर करीत आहे. या कारागीरांनी तयार केलेल्या स्वदेशी उत्पादनांसाठी अनेक निर्यात प्रोत्साहन समित्यांनी मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय बाजारपेठा उपलब्ध करुन देण्यास रस दर्शविला आहे.

“हुनर हाट” पुन्हा आयोजित करण्यात येणार असल्यामुळे देशभरातील लाखो कुशल कारागीर आणि शिल्पकारांमध्ये आनंद आणि उत्साह दिसत आहे असे नक्वी म्हणाले.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya