चीनमधून कोरोना आल्याचे कधीच विसरणार नाही : ट्रम्प

 

स्थैर्य, वॉशिंग्टन, दि.२८: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनमधून कोरोनाचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली असल्याचा उल्लेख केला आहे. चीनमधून कोरोना आलाय ही गोष्ट आपण कधीच विसरणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. जर देशातील नागरिकांनी त्यांना पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी मतदान केलं तर अमिरेका चीनसोबतचे सर्व संबंध तोडून टाकेल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. कोरोनानंतर आपल्यासाठी बीजिंगचं महत्त्व पूर्वीप्रमाणे राहिलं नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

अमेरिकेत ३ नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प एका प्रचारसभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी सांगितलं की, ‘अमेरिकेची अर्थव्यवस्था अत्यंत चांगल्या स्थितीत असताना चीनमधून कोरोना संसर्गाचा हल्ला झाला’. पुढे ते म्हणाले की, ‘त्यांनी असं होऊ द्यायला नको होतं, आम्ही हे कधीच विसरणार नाही’. ‘आम्ही संपूर्ण देशावर बंधनं आणली होती. आम्ही लाखो लोकांचे जीव वाचवले. आता आम्ही निर्बंध शिथील केले असून नवा रेकॉर्ड केला आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली

कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत दोन लाखांहून अधिक नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही कोरोनाचा मोठा फटका बसला असून लाखो लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे.

ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, ‘जर मला अजून चार वर्ष मिळाली तर अमेरिकेला देशातील उत्पादन महासत्ता बनवणार. चीनवर अवलंबून राहणं पूर्णपणे संपवून टाकणार’. डोनाल्ड ट्रम्प आणि चीनसोबत व्यापारी करारांवर स्वाक्षरी झाल्यानंतर काही काळातच कोरोना संकट निर्माण झालं होतं. या करारासाठी अमेरिका आणि चीनमध्ये जवळपास एक वर्ष चर्चा सुरु होती.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya