एसटी कामगारांचे प्रश्न आठवड्यात न सोडविल्यास रस्त्यावर उतरु : दरेकर

 

स्थैर्य, मुंबई, दि.२३: एसटी कामगारांना गेले तीन महिने वेतन दिले जात नाही. अन्य मागार्ने कर्मचारी आपला उदरनिर्वाह करत आहेत. राज्यातील डेपोमध्ये एसटी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. एसटी कामगाराचा मुलगा असल्याने मी एसटीचे चेअरमन यांना भेटून वेतनाच्या समस्या सांगितल्या. एसटी कामगारांच्या समस्या सुटल्या नाही तर भाजपने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

तीन महिन्याचे थकित वेतन देण्यात यावे, तीनशे रुपयांचा भत्ता देण्यात यावा, कोविडने मृत्यू पावलेल्या एसटी कामगारांना 50 लाखाचा विमा देण्यात यावा, अशा माझ्या मागण्या होत्या. परिवहन मंत्र्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेऊन वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे वचन दिले आहे. ती मागणी मान्य झाली नाही तर राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्जे उभारून वेतन दिले जाईल. एसटी महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे तातडीने एसटी कामगारांचे थकीत वेतन आणि मागण्या मंजूर कराव्यात, अशी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो, अन्यथा भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज दिला. 

एसटी कर्मचा-यांचा सरसकट 50 लाखाचा विमा मंजूर करण्याची मागणी केली आहे. एसटीचे स्वतंत्र कोविड केंद्र उभारावे, अशी मागणी आहे. ही मागणी तेथील सरकारने पूर्ण करावी, अशी मागणी दरेकर यांनी केली. मराठा आरक्षणाची तीव्रता असून राज्य सरकारने तातडीने यावर मार्ग काढावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आवश्यक दक्षता घेऊनच जनजीवन सुरळीत केले पाहिजे, असे दरेकर यांनी अन्य प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya