म्हसवड शहरात आणखी ५ नव्या कोरोना रुग्णांची भर, तर एकाचा मृत्यु

 

म्हसवड येथे कोरोना बाधितावर अंत्यसंस्कार करताना पालिकेचे कोव्हीड योध्दे.

स्थैर्य, म्हसवड दि. १४: म्हसवड शहरात कोरोना बाधितांचा आकडा हा गत अठवड्याच्या तुलनेत काहीसा कमी झालेला असला तरी शहरातील मृत्यु दर मात्र काहीसा वाढलेला दिसुन येत असल्याने शहरात कभी खुशी कभी गम अशी अवस्था प्रशासनासह म्हसवडकर जनतेची झाली आहे. दरम्यान शहरात दि. १४ रोजी ५ नवीन रुग्णांची भर पडली आहे.

म्हसवड शहरात कोरोनाची साखळी तुटण्याचे नाव घेईना असे चित्र आहे दररोज वाढणार्या नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे ही काहीशी समाधानाची बाजु असली तरी शहरात बाधितांच्या मृत्युचे प्रमाण ही हळुहळु वाढु लागल्याची दुसरी बाजु असुन यामुळे मात्र म्हसवडकर नागरीक भयभित झाले आहेत तर प्रशासन ही हडबडले आहे. 

येथील एका खाजगी रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरु असलेल्या शहरातील कोष्टी गल्ली येथील एका वयोवृध्दाचा आज दि. १४ रोजी उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने म्हसवडकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे मागील सलग ३ दिवसांपासुन शहरातील ३ जणांना आपले प्राण कोरोनामुळे गमवावे लागल्याची वस्तुस्थिती असुन शहर हे कोरोनामुळे भयभित झाले अाहे. कोरोनाला शहरातुन हद्दपार करण्यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्न करीत असुन यासाठी शहरात गत १० दिवसांपासुन लॉकडाऊन सुरु आहे मात्र लॉकडाऊन नावाला अन सर्व काही मिळतय मागणार्याला अशी अवस्था शहरात सुरु असल्याने या कोरोनावर नियंत्रण कसे मिळवायचे असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. एकीकडे प्रशासनासोबत शहरातील म्हसवडकर टिम हे रस्त्यावर उतरुन काम करीत असुन कोरोनाला हरवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, तर दुसरीकडे काही जण मात्र शासकीय नियमांची पायमल्ली करुन प्रशासनासह म्हसवडकर टिमचे हे प्रयत्न तोकडे ठरवत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान आज म्हसवड येथील मृत कोरोना बाधित वर म्हसवड पालिकेच्या कोव्हीड योध्द्यांकडुन शासकीय नियमांप्रमाणे येथील माणगंगा वैकुंठ स्मशान भुमीच्या पाठीमागे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी सचिन माने, स.पो.नि. गणेश वाघमोडे, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, सागर सरतापे व पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya