आगामी काळात सर्व सभा ह्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घेण्यात याव्यात : समशेरसिंह नाईक निंबाळकर; आमच्या उपसूचनेस मतदान दिल्याबद्दल त्या सर्व नगरसेवकांचे आभार


स्थैर्य, फलटण : फलटण नगर परिषद सर्वसाधारण सभा शासन निर्देशानुसार प्रथमच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुकतीच संपन्न झाली, सकाळी ११ ते ३.३० अशी सुमारे साडेचार तास चाललेल्या या सभेत एकूण २५ विषय ठेवण्यात आले होते. सत्ताधारी काही नगरसेवकांनी आमच्या उपसूचनेस मतदान दिल्याबद्दल त्या सर्व नगरसेवकांचे आभार मानत आगामी काळात सर्व सभा ह्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घेण्यात याव्यात, अशी मागणी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. 


सर्वसाधारण सभेनंतर विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी नगर परिषदेतील विरोधी पक्षाचे गट नेते अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन सुर्यवंशी बेडके, सचिन अहिवळे, अनुप शहा उपस्थित होते.

स्वतःचे गौडबंगाल लपविण्यासाठी इतिवृत्त दिले जात नाही : समशेरसिंह

सभेपूर्वी मागील सभेचे इतिवृत्त देण्यात आले नसल्याचे निदर्शनास आणून देताच नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी इतिवृत्त सर्वांना ई-मेलवर पाठविल्याचे सांगितले मात्र प्रत्यक्षात इतिवृत्त दिले नाही, स्वतःचे गौडबंगाल लपविण्यासाठी इतिवृत्त दिले जात नसल्याचा आरोप यावेळी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केला.

नगर परिषदेने केलेल्या कामाचे श्रेय कमिन्स घेतेच कशी ? : समशेरसिंह

शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून होत असलेली विकास कामे पूर्ण झाल्यानंतर कमिन्स कंपनी त्याठिकाणी सदर काम कमिन्सच्या माध्यमातून झाल्याचा फलक लावून सदर कामे आपण केल्याचा डंका कमिन्स पिटत असल्याचा आरोप करीत नगर परिषदेने केलेल्या कामाचे श्रेय कमिन्स घेतेच कशी असा सवाल समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी उपस्थित केला आहे.

शहर वासीयांना सांस्कृतिक भवन पेक्षा कोरोना केअर सेंटरची अधिक गरज : अशोकराव जाधव

प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन दुरुस्तीसाठी होणारा खर्च सुसज्ज कोरोना केअर सेंटर उभारणीसाठी करावा अशी मागणी आपण केली आहे, सदर सांस्कृतिक भवन इमारत प्रशस्त व मध्यवर्ती असल्याने आणि आज शहर वासीयांना सांस्कृतिक भवन पेक्षा कोरोना केअर सेंटरची अधिक गरज असल्याने शहराच्या मध्यवर्ती भागातील या इमारतीमध्ये कोरोना केअर सेंटर उभारल्यास ते उपयुक्त ठरेल असे आपण सभागृहाला पटवून दिल्याचे अशोकराव जाधव यांनी यावेळी सांगितले.

सत्ताधारी मंडळींकडून विकास कामांची दुर्दशा : अशोकराव जाधव

शहरातील विविध विकास कामांना योग्य दिशा देऊन ती पूर्ण न करता सत्ताधारी मंडळी या विकास कामांची दुर्दशा करीत असल्याचे नमूद करीत सध्या क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते रिंग रोडवर सर्व अनधिकृत कामे सुरु असून त्यापैकी काही विकास कामांबाबत न्यायालयात विषय प्रलंबीत असताना सदर कामे रेटून सुरु असल्याचे अशोकराव जाधव यांनी सांगितले.

श्रीमंत रामराजेंचा सन्मान केला तर खासदार रणजितसिंह यांचा पण सन्मान करण्यात यावा : अशोकराव जाधव

विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा नगर परिषदेतर्फे सन्मान करण्याचा प्रस्ताव नगरसेवक पांडुरंग गुंजवटे  वगैरे ५ नगरसेवकांनी दिला आहे, त्यांच्या समवेत माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचाही नगर परिषदेतर्फे सन्मान व्हावा अशी आमची मागणी आहे, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सन्मान होणार नसेल तर अन्य कोणाचाही सन्मान नगर परिषदे तर्फे होऊ देणार नसल्याचे यावेळी अशोकराव जाधव यांनी सांगितले.

भुयारी गटारच्या पम्पिंग स्टेशनसाठी जागा सत्ताधारी नगरसेवकांच्या हितासाठी : अनुप शहा

शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामासाठी काही खाजगी जागा भूसंपादन करुन ताब्यात घेण्याच्या प्रस्तावास आमचा विरोध असून सत्ताधारी मंडळी व नगर सेवकांच्या हितासाठी घेतल्या जाणार असल्याचा आरोप अनुप शहा यांनी केला आहे.

घनकचरा प्रक्रिया केंद्रात शेडला ७४ लाख रुपये लागणार नाहीत : अनुप शहा

कोरोना प्रादुर्भाव नियंत्रण उपाय योजनांसाठी आवश्यक असल्याने कार्डियाक रुग्णवाहिका, शववाहिका खरेदीस पाठींबा दिल्याचे निदर्शनास आणून देत परंतू ट्रॅक्टर व डंम्पिंग ट्रॉली खरेदी करताना सद्या ठेकेदारांच्या वापरात असलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉली बंद करणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी मान्य केल्याने त्या प्रस्तावासही मान्यता दिल्याचे सांगून मात्र घनकचरा प्रक्रिया केंद्र येथे ७४ लाख रुपये खर्च करुन उभारण्यात येणार असलेल्या शेडला एवढी रक्कम लागणार नाही म्हणून विरोध करताच बहुमताने सदर विषय मंजूर करुन घेण्यात आल्याचे अनुप शहा यांनी सांगितले.

अनधिकृत व बेकायदेशीर कामे पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर : अनुप शहा

या सर्वसाधारण सभेत अनेक अनधिकृत व बेकायदेशीर कामे पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर करुन घेण्यात आल्याचा आरोप यावेळी अनुप शहा यांनी केला आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya