भारतीय जवानांचा चीनमध्ये घुसून गोळीबार?; लडाख सीमेवर तणाव वाढला


स्थैर्य, सातारा, दि.८: भारतीय लष्कर आणि चिनी सैन्याच्या तुकड्या लडाख सीमेवर गेल्या तीन महिन्यांपासून एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या असतानाच सोमवारी रात्री उशिरा येथे गोळीबार झाल्याचे वृत्त असून तणावात आणखी भर पडली आहे. या गोळाबाराबाबत भारतीय लष्कराकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसून चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने गोळीबाराचा दावा केला आहे. 

भारत-चीन सीमेवरील तणाव वाढतच चालला आहे. त्यातच लडाख सीमेवर भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये पुन्हा एकदा धुमश्चक्री झाल्याचे वृत्त आहे. भारतीय जवानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून चीनच्या हद्दीत प्रवेश करत गोळीबार केल्याचा आरोप ग्लोबल टाइम्सच्या वृत्तात करण्यात आला आहे.

चीनच्या वेस्टर्न थीएटर कमांडच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने ग्लोबल टाइम्सने या गोळीबाराचे वृत्त दिले आहे. ‘भारतीय सैन्याने शेनपाओ पर्वतरांगांमध्ये पँगाँग सरोवराच्या दक्षिण किना-याजवळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार केली व गस्तीवरील चिनी सैनिक त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत असतानाच समोरून गोळ्या झाडल्या. बदल्यात चिनी सैनिकांनीही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलली’, असे हा प्रवक्ता म्हणाल्याचा दावा ग्लोबल टाइम्सने केले आहे. भारताकडून याबाबत अधिकृत निवेदन आल्यानंतरच चीन खरं बोलतंय की, खोटं बोलतंय, हे स्पष्ट होणार आहे.

भारत सरकार किंवा भारतीय लष्कराकडून चीनच्या दाव्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. एएनआय या वृत्तसंस्थेनेही पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार झाल्याचे तसेच भारत-चीन यांच्यातील तणाव वाढल्याचे वृत्त दिले आहे.

Previous Post Next Post