भारताची आण्विक पाणबुडी ‘अरिघात’ सज्ज


स्थैर्य, मुंबई, दि.९: चिनी नौदलाची वाढती ताकद पाहून भारतही सज्ज झाला आहे. भविष्यातला धोका ओळखून अनेक विध्वंसक शस्रं नौदलात दाखल केली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय नौदलात सर्वशक्तिमान शस्र दाखल होतं आहे. 

आयएनएस अरिघात ही भारताकडची दुसरी आण्विक पाणबुडी असेल. जी पुढच्या २ ते ३ महिन्यात समुद्रात दाखल होईल. मागच्या ३ वर्षांपासून अरिघातची चाचणी सुरु होती. ती चाचणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे या वर्षातच भारताची आयएनएस ‘अरिघात’ शत्रूवर आघात करण्यासाठी सज्ज असेल. अरिघात पाणबुडी सज्ज होताच चीन आणि खासकरुन पाकिस्तानच्या चिंता मात्र वाढणार आहेत. 

आयएनएस ‘अरिघात’ची निर्मिती अत्यंत गुप्तपणे केली गेली. २०१७ मध्ये या पाणबुडीचं लाँचिंग सुद्धा गुप्त ठेवलं गेलं होतं. लाँचिंगआधी पाणबुडीचं नाव आयएनएस अरिदमन होतं. लाँचिंगवेळी त्यात बदल करुन आयएनएस अरिघात केलं गेलं. 

अरिघात पाणबुडीबाबत जी माहिती समोर आली आहे, त्यानुसार डिसेंबरमध्ये अरिघात पाणबुडी नौदलाला सुपूर्त केली जाईल. ही पाणबुडी अरिहंत क्लासमधलीच दुसरी पाणबुडी असली, तरी आयएनएस अरिहंतहून कैक पट घातक आहे. विशाखापट्टनमच्या शिपबिल्डिंग सेंटरमध्ये अरिघातची निर्मिती केली गेली. बनावट आणि मा-याच्या अनोख्या तत्रंज्ञानामुळे अरिघात पाणबुडी भारतीय नौदलाकडचं ब्रह्मास्र ठरेल. 

आयएनएस अरिघातची वैशिष्ट्ये

आयएनएस अरिघात मध्ये ७ ब्लेडवाला प्रोपेलर आहे. ही पाणबुडी प्रेशराईज्ड पाण्याच्या रिअ‍ॅक्टरवर चालते. आतापर्यंतची भारताची सर्वात वेगवान पाणबुडी आहे. समुद्रावर पाणबुडीचा वेग १२ ते १५ नॉटिकल मैल असेल, तर खोल पाण्यातला वेग २४ नॉट्सपर्यंत जाईल. म्हणजे समुद्राच्या पाण्यावर अरिघात ताशी २२ ते २८ किलोमीटर तर समुद्राच्या आतमध्ये ताशी ४४ किलोमीटर वेगानं धावेल. तिचा हा वेगच शत्रूला चकवा देण्यासाठी महत्वाचा आहे. मात्र, फक्त वेगच नाही, तर इतर असंख्य खुब्यांनी आयएनएस अरिघात परिपूर्ण आहे. 

आयएनएस अरिघातमध्ये अरिहंतप्रमाणेही ४ लॉन्च ट्यूब आहेत. मात्र, शस्त्रांची क्षमता आयएनएस अरिहंतपेक्षा दुप्पट आहे. सागरिका मिसाईलची रेंज ७५० किलोमीटरपर्यंत आहे. त्याशिवाय, या पाणबुडीला के-४ मिसाईल सुद्धा असेल. जिची मा-याची क्षमता तब्बल ३५०० किलोमीटरपर्यंत आहे.

Previous Post Next Post