अभिराम भडकमकर यांच्या लेखणीतून साकार झालेलं "इंशाअल्लाह"

 


स्थैर्य, सांगली, दि. २५ : मध्यंतरी बेंगलोर मध्ये झालेली दंगल, स्वीडन मध्ये झालेली जाळपोळ या दोन घटना ज्या वेळी घडत होत्या तेंव्हा माझ्या हातात एक पुस्तक आलं ते म्हणजे अभिराम भडकमकर यांच्या लेखणीतून साकार झालेलं "इंशाअल्लाह".


आता त्या दोन घटना आणि कादंबरी याचा काय संबंध आहे, असं वाटेल कदाचित. पण त्या गोष्टी कशामुळे झाल्या असू शकतात किंवा त्या कश्या टाळत्या आल्या असत्या याचं उत्तर या कादंबरी मध्ये आहे असं मला वाटतं.


वरच्या घटनांमध्ये आणि आपल्या राजकारण आणि समाजकारण या विषयांमध्ये एक धर्म नेहमीच ट्रेंडिंग वर असतो तो म्हणजे "इस्लाम".

इस्लाम आपल्या कडे अनेक विषयांतून, अनेक बातम्यांमधून नेहमीच चर्चेचा विषय असतो. 

पण हे राजकारण करताना, चर्चा करताना, थेट कोणत्याही निष्कर्षावर येण्याआधी आपण नेमकं हे विसरत चाललोय की जे मुद्दे चर्चा म्हणून मांडले जातात ते खरंच या धर्माचे, समाजाचे प्रॉब्लेम आहेत का? की आता "इस्लाम" फक्त राजकारणी लोकांच्या भाकऱ्या भाजण्याचं साधन बनला आहे का? हे प्रश्न नेहमी मनात येतात. 


या चर्चा किंवा आरोप प्रत्यारोपाच्या खेळात लोकांचं काय म्हणणं आहे किंवा शिकलेल्या तरुण पिढीला नेमकं काय वाटतं याच्या कडे नेहमीच दुर्लक्ष होत आलं आहे आणि त्याचं नेमकं चित्रण अभिराम भडकमकर यांनी "इंशाअल्लाह" मध्ये केलं आहे.


कथा सुरू होते ती जुनेद नावाच्या एका तरुणाच्या गायब होण्यावरून. जुनेद च्या शोधा भोवती फिरणारं हे कथानक अनेक धार्मिक गोष्टींना, चर्चांना, माणसांना, राजकारणाला स्पर्श करत आपल्या समोर उलगडत जातं. 


शहरात घातपाताचा  कट पोलीस उधळून देतात आणि त्या नंतर अचानक पोलीस मुस्लिम मुलांची धरपकड सुरू करतात आणि त्यातच जुनेद गायब झाल्याने त्याच्या भोवतीचं संशयाचं वारूळ तयार होतं. मग सुरू झालेला जुनेद चा शोध समाजातील एक एक घटकांना स्पर्श करत पुढं पुढं सरकू लागतो.


हजारो वर्षांपूर्वी लिहलेल्या धर्मग्रंथांचा आधार घेऊन आताच्या काळातली सामाजिक समीकरणं बांधणं तसं कठीण आहे. मुळात त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची अवस्था या मध्ये जमीन अस्मानाचा फरक. पण तरीही त्या रूढी, परंपरा जोपासत आपण अजूनही तसेच खितपत पडलो आहोत. म्हणजे "धर्म" या गोष्टीला मान्यता देत नाही, या शीर्षकाखाली नेहमीच चांगल्या गोष्टींची गळचेपी होते. हे असे नेमके मुद्दे जुनेद च्या शोध बरोबर कादंबरीतून आपल्या समोर येतात. 


इतकेच नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोन, पुरोगामी विचारसरणी, शिक्षण, बेरोजगारी, आरोग्य, कट्टरतावाद, स्त्रियांचं आयुष्य या वर टाकलेला प्रकाश विचार करायला लावतो. जाणीव करून देतो. 


कादंबरी वाचून झाली त्यावेळी मी लगेच एक स्टोरी टाकली होती. त्यात असं लिहलं होतं की, "धर्म" या बद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरं यात आहेत. 

आता कथेचा मुख्य गाभा "इस्लाम" बद्दल जरी असला तरी धर्मच्या दृष्टीने सर्व प्रश्न, चर्चा यात आहेत. म्हणजे एकीकडे  आपल्या धर्मात, लोकांमध्ये सुधारणावादी विचार रुजवण्यासाठी धपडणारा "झुल्फि" आहे तर त्याच वेळी त्याला विरोध करणारे त्याच्याच धर्मातले कट्टर ही आहेत.


जुल्फिची हिंदू मित्रांबरोबरची चर्चा ही खरंच डोळे उघणारी आहे. 


ब्राह्मण म्हटलं की तो मनुवादी, मुसलमान म्हटलं की तो कट्टर अशी जी एकंदरीत आपली विचारसरणी बनली आहे, याला कुठे तरी लगाम घातला पाहिजे. हे करताना पुरोगामी असण्याच्या नावाखाली धार्मिक तेढ न निर्माण करता समतोल समाजिक जीवन कसं आत्मसात करता येऊ शकतं याची शिकवण या कथेत आहे.


"कौन कहता है की आसमान मे छेद हो नही सकता

एक पत्थर तो तबियत से उछालो यारो" 


या रफिक च्या बोलण्यावर झुल्फि म्हणतो,

आपल्या वाटणीचं आभाळच फाटलंय. ते शिवायचं सोडून पत्थर मारायची भाषा कशाला?


"कौन कहता है फटे आसमान को सिया नही जा सकता

एक सुईधागा तो तबियत से चला दो यार..." 


या दोन विचारात कथेचं सार अभिराम यांनी सांगितले आहे.


सुमित धनंजय गाडगीळ, सांगली  Previous Post Next Post