मुंबई पोलिसांवर टीक करणा-या कंगनाला संजय राऊत यांनी सुनावले खडे बोले, पुन्हा ट्विट करत कंगना म्हणाली - 'मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?'

 

स्थैर्य, मुंबई, दि. ३: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर सातत्याने आपले रोखठोक मत मांडणारी अभिनेत्री कंगना रनोट हिने अलीकडेच थेट मुंबई पोलिसांवर टीका करत नवीन वादाला तोंड फोडले. आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असे सांगून तिने मुंबई पोलिसांची सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. भाजपचे आमदार राम कदम यांनी केलेल्या ट्विटवर तिने ही भूमिका घेतली होती. मात्र आता कंगनाच्या या भूमिकेवरून संजय राऊत यांनी तिला चांगले खडे बोल सुनावले आहेत. सोबतच राज्य सराकारकडे एक मागणीही केली आहे.

भाजप नेते राम कदम यांनी सुशांत मृत्यू प्रकरणी कंगनाला सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली होती. राम कदम यांच्या ट्विटला कंगनाने उत्तर दिले होते. “मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय. हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी, पण मुंबई पोलिस नको', असे कंगना म्हणाली होती.

संजय राऊत काय म्हणाले? 

कंगनाने महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'मुंबई पोलिसांवर अविश्वास तुम्ही दाखवताय. कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर त्यांनी आपले चंबू गबाळ आवरावे आपल्या राज्यात परत जावे. हा काय तमाशा चाललंय', असे ते म्हणाले. 

राऊत पुढे म्हणाले, राज्याच्या गृहमंत्र्यांनी यावर उत्तर दिले पाहिजे, मग ते कोणी असेल. या राज्यावर, पोलिसांवर विश्वास नाही. तुम्ही इकडे मीठ खाताय, ही तर बेईमानी आहे. अशा व्यक्तींच्या मागे राजकीय पक्ष उभे राहत असतील तर हीसुद्धा मोठी बेईमानी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी हा विषय गांभीर्याने घेत अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे, असे ते म्हणाले. 

संजय राऊत यांच्या प्रत्युत्तरानंतर कंगनाने केले पुन्हा ट्विट

संजय राऊत यांनी दिलेल्या उत्तरानंतर कंगनाने पुन्हा एक ट्विट करत मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे? असे म्हटेल आहे. तिने ट्विट केले, ' आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?', असा प्रश्न कंगनाने आपल्या ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

सुशांत प्रकरणात कंगनाला करायची आहे मदत

रिया चक्रवर्तीचे ड्रग्ज संदर्भातील चॅट समोर आल्यानंतर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. व्हायरल झालेल्या या चॅटमध्ये रिया चक्रवर्ती ड्रग्ज डिलींग करत असल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर बॉलिवूड आणि ड्रग्जचा संबंध असल्याचे कंगनाने म्हटले होते. बॉलिवूडमधील पार्ट्यांत कोकेन हमखास वापरले जाते. त्यामुळे आपल्याला नार्कोटिक्स ब्युरोची मदत करायची आहे पण त्यासाठी संरक्षण हवे असल्याचे, कंगनाने एक व्हिडिओ ट्विट करत म्हटले होते.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya