खडसेंचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

 

स्थैर्य, जळगाव, दि.६: मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यामुळे माझ्यावर अन्याय झाला आहे. माझ्यावर खोटे आरोप करणा-या हॅकर मनिष भंगाळे याला त्याचवेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशासाठी भेट दिली? ‘मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार’ असे म्हणत विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांच्या तिकिटांची काटछाट केल्यामुळेच भाजपचे सरकार येवू शकले नाही, अशा शब्दांत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर हल्ला चढविला आहे. आपल्यावर झालेल्या या अन्यायाबाबत ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ नावाचे पुस्तक लिहिणार असल्याचेही खडसे यांनी सांगितले.

मुक्ताईनगर येथील आपल्या निवासस्थानी बोलताना खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप सरकारमधील तत्कालीन मंत्र्यांबाबत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. मागील सरकार स्थापनेनंतरच्या काळात मुख्यमंत्रिपदाचा मी दावेदार आहे, हे लक्षात आल्यानंतर एक षडयंत्र रचलं गेलं. माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय काळात एकही आरोप झालेला नसताना सरकार आल्यानंतर अवघ्या वर्षभरातच माझ्यावर एका मागून एक आरोप करण्यात आले. हा त्या षडयंत्राचाच भाग होता, असा दावा खडसे यांनी केला.

भंगाळे-फडणवीस भेटीचे फोटो आहेत

माझे दाऊदच्या बायकोबरोबर बोलणे होत असल्याचा आरोप हॅकर मनिष भंगाळे याने केला. देशभर हे प्रकरण गाजत असताना त्याच दिवशी हा मनिष भंगाळे मध्यरात्री दीड वाजता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटला. त्याच्यासोबत कृपाशंकर सिंह देखील होते. त्याचवेळी त्यांच्या भेटीचे फोटोग्राफ माझ्याकडे आले होते. देवेंद्र फडणवीसांनी रात्री दीड वाजता मनिष भंगाळे याला भेटण्याचे कारण काय? असा सवाल देखील खडसे यांनी केला आहे.

त्यानंतर पुन्हा माझ्या जावयाने लिमोझिन घेतली, मी एमआयडीसीची जमीन विकत घेतली, असे आरोप करण्यात आले. जमीन खरेदीची झोटिंग समितीकडून चौकशी करण्यात आली. त्या अहवालात देखील काही तथ्य नव्हते, असे खडसे यांनी नमूद केले.

माझ्यावर आरोपांचे हे षडयंत्र होते. हे षडयंत्र कुणी केले? कसे केले? त्यात कोण होते? कोणत्या मंत्र्याचे पीए होते? कोण अंजली दमानिया यांना भेटत होते, याच्या व्हिडिओ क्लिपदेखील माझ्याकडे आहेत. मी हे पुरावे वरिष्ठांना देखील दाखविणार आहे. काही पुरावे मी यापूर्वीच वरिष्ठांना दाखविल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले.

तसेच एका मंत्र्याचा पीए व एका महिलेचे नग्न फोटोदेखील माझ्याकडे होते, ते देखील मी वरिष्ठांना देवून या मंत्र्याचे व त्याच्या जवळच्या लोकांचे काय उद्योग आहेत, त्याचीही माहीती वरिष्ठांना दिल्याचे खडसे म्हणाले. मी काय गुन्हा केला आहे? असे वारंवार विचारतो आहे, असे सांगताना मी दोषी असेन तर मला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मीच विधानसभेत केल्याची आठवणही खडसे यांनी यावेळी करून दिली.

‘मी पुन्हा येणार’ हा अहंकार नडला

मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार हा अहंकार होता. ही भूमिका लोकांना आवडली नाही. त्याच जागी जर आम्ही पुन्हा येणार म्हटले असते तर लोकांना आवडले असते. मी येणार मधला ‘मी’पणा लोकांना आवडला नाही. याचा परिणाम असा झाला की, भाजप-शिवसेनेचे सरकार येवू शकले नाही. युती नसताना १२३ जागा आल्या होत्या मग आता युती असताना का सरकार आले नाही, याचे उत्तर कोण मागेल? असा सवालही खडसे यांनी केला.

चार दिवसांच्या संसारावर फटकेबाजी!

देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका-टिप्पणी करूच शकत नाहीत. कारण सर्व तत्त्व, सत्त्व विसरून फडणवीसांनी त्यांच्यासोबत चार दिवसांचा संसार केला आहे. मुहूर्त साधला, लग्न केले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. तीन, चार दिवस एकत्र राहिले. चार दिवस दुस-याच्या घरात राहून तुम्ही पतीव्रता कसे राहू शकतात? तुम्ही नैतिकता हरविली आहे, असा घणाघाती आरोप खडसे यांनी केला. खडसे म्हणाले की, पूर्वी पक्षात गोपीनाथ मुंडे आक्रमक शैलीत बोलायचे. दुस-या बाजूला भाऊसाहेब फुंडकर यांची तोफ चालायची. तिकडे नागपूरला गेले तर नितीन गडकरी यांचा तोफखाना एकदम जोरात चालायचा. इकडे गिरीश बापट, विनोद तावडे, पंकजा मुंडे मी स्वत: तसेच हरिभाऊ बागडे असे अनेक नेते सरकारविरोधात आवाज उठवत असत. त्यावेळी सरकार गांगरून जायचे. एकदम हादरून जायचे. मात्र, आता महाराष्ट्रात सर्व नेतेमंडळी गुपचूप बसली आहे. सुधीर मुनगंटीवार कुठे आहेत, पंकजा मुंडे काही बोलत नाही. तुम्ही निवडून दिलेले जे पदाधिकारी आहेत, चंद्रकांत पाटील यांच्यासह ते कधीतरी बोलतात. आताच्या घडीला सरकारविरोधात आक्रमक भाषा पाहिजे, त्यात आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत, असे माझे वैयक्तिक मत असल्याचे सांगत खडसेंनी फडणवीस यांच्या नेतृत्त्वावरच शंका उपस्थित केली आहे.
Previous Post Next Post