कृष्णेश्वर मंदिर, सातारा

 


स्थैर्य, सातारा, दि. ०६ : पर्यटन म्हणजे नेहमी लांबच जायला हवं असं काही नाही. काही वेळा आपल्या अगदी जवळ असणारी ठिकाणे आपण बघितलेली नसतात. आणि बघितल्यानंतर एवढे जवळ असूनही एवढं सूंदर ठिकाण कसं काय माहीत नव्हतं अशीच भावना होते.

 

असच साताऱ्याच्या कृष्णेश्वर मंदिराबद्दल ऐकलं होतं पण कधीही जायचा योग आला नव्हता. काही दिवसांपूर्वी ह्या मंदिरामध्ये जाऊन आलो.

 

मंदिर आणि परिसर खूप मस्त आहे. मूळ मंदिर दगडी आहे. गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप अशी रचना आहे. महादेवाची सूंदर पिंडी आणि समोर नतमस्तक असणारा नंदी मनाला समाधान देऊन जातो. सभामंडपामध्ये सहा दगडी पूर्णस्तंभ आहेत. शिखर विटांमध्ये आहे. हे देवालय पहिल्या बाजीराव पेशव्यांचे मामा (सासरे ) कृष्णाजी चासकर यांनी महादरे तळ्याजवळ सातारा शहराच्या पश्चिम टोकास शके १६४५ म्हणजेच २७ जानेवारी १७२४ मध्ये बांधले. तेव्हा या भागाला सदाशिवपुरा असे म्हणत होते. मंदिर बांधल्यानंतर पाच वर्षांनी व्यंकटराव घोरपडे या भागात वाडा बांधून राहू लागले. तेव्हापासून या परिसरास व्यंकटपुरा पेठ असे म्हणू लागले.

इथले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराबाहेर असणारे पाण्याचं टाकं. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर डाव्या हाताला ओढ्याच्या काठाला एक छोटंस पण अतिशय सूंदर पण दुर्लक्षित असं पाण्याचे टाके आहे. संपूर्ण बांधकाम दगडी आहे. टाक्यांची रचना साधारणपणे पाण्यापर्यंत जाण्यासाठी बांधलेल्या पायऱ्या, एक दगडी कमान आणि आत मध्ये एक छोटेसे सूंदर दालन अशी आहे. थोडे उतरल्यानंतर डाव्याबाजूला एक दगडी कमान दिसते. दगडी कमानीमधून आत गेल्यानंतर एक छोटे दालन आहे. तिथे चार पाच जण सहज बसू शकतील. वरच्या बाजूने पाण्यापर्यंत जाण्यासाठी सुंदर दगडी पायऱ्या आहेत. सध्या इथे भरपूर झाडी वाढली आहे. 


व्यंकटपुरा पेठेतल्या गोखले हौदापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर आपण मंदिरापाशी येऊन पोचतो. 


हे मंदिर आणि पाण्याचे टाके खरचं एकदा तरी बघायलाच हवे.


शैलेश करंदीकर, ड्रीम टूर्स, साताराPrevious Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya