कुडाळचे कोरोना केअर सेंटर रुग्णांसाठी संजीवनी ठरेल

 


स्थैर्य, पांचगणी, दि. 25 : उपचाराअभावी अनेक कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशावेळी अत्यवस्थ रुग्णांना मोठ्या रुग्णालयात बेड मिळेपर्यंत प्राथमिक उपचार सुरू व्हावेत, या उदात्त हेतूने कुडाळ ग्रामस्थांच्या वतीने लोकसहभागातून सुरू करण्यात आलेले कोरोना इमर्जन्सी केअर सेंटर रुग्णांसाठी संजीवनी देणारे ठरेल, असे प्रतिपादन आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.


लोकसहभागातून साकारलेले कुडाळ येथील कोरोना इमर्जन्सी केअर सेंटरचे आ. भोसले यांच्या हस्ते उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले. यावेळी जावली पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे, तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते, डॉ. विलास परामणे, डॉ. मनोहर ससाणे, जावली तालुका शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र शिंदे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक जितेंद्र शिंदे, मालोजीराव शिंदे, माजी सभापती सौ. अरुणा शिर्के, माजी उपसभापती रवींद्र परामणे, डॉ, प्रमोद जंगम, डॉ. अमोल पालवे, कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत वेलकर, डॉ. चव्हाण यांची उपस्थित होते.


आ. भोसले म्हणाले, लोकसहभागातून साकारलेले कुडाळचे इमर्जन्सी कोरोना सेंटर हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम आहे. सध्या कोरोना संसर्गाची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु लोकांनी घाबरून जाऊ नये परंतु काळजी घ्यावी. लोकांनी कोरोना होऊच नये यासाठी अधिक दक्ष रहावे.


सौरभ शिंदे म्हणाले, कोरोनामुळे आपल्या जवळच्या लोकांची होणारी तडफड आणि अनेकांचे जात असलेले प्राण पाहून कुडाळच्या युवकांनी कुडाळ येथे कोविड सेंटर निर्माण करण्याचा निर्धार केला. त्याला ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अवघ्या आठ दिवसात दोन लाखांवर निधी जमा होऊन ऑक्सिजनसह आठ बेडची सुविधा निर्माण झाली. प्रशासनाने या ठिकाणी आवश्यक आरोग्य यंत्रणेसह हे केंद्र सुरळीत चालवावे.


यावेळी तहसीलदार शरद पाटील यांनी या इमर्जन्सी कोविड केअर सेंटरला आवश्यक ती मदत केली जाईल, असे सांगितले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी शासन पातळीवर या सेंटरसाठी आवश्यक मनुष्यबळ निर्माण करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले.


यावेळी डॉ. मनोहर ससाणे व डॉ. विलास परामणे यांनी कुडाळ ग्रामस्थांच्या या संकल्पनेचे कौतुक करून यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे सांगितले. कोरोनाला लोकांनी घाबरू नये. कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने कोरोनाचे निदान करून योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.


या कोविड सेंटरसाठी कुडाळ येथील उदयसिंह शिंदे यांनी एक व आखाडे येथील मुंबई स्थित उद्योजक सचिन व संदीप शिंदे बंधू यांनी एक ऑक्सिजन मशीन भेट दिले असून एक मशीन लोकसहभागातून घेण्यात आले आहे तसेच अद्वैत वॉटर सर्व्हिसेसचे ज्ञानेश्‍वर शेलार यांच्यावतीने वॉटर प्युरिफायर मशीन भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश बारटक्के यांनी केले. यावेळी युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post Next Post