व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णाने रिक्षा मध्येच जीव सोडला

 


स्थैर्य, मेढा, दि. ०७ : जावळी तालुक्यातील मेढा येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. मेढ्यात कोरोनाने दोनशे रुग्णांचा टप्पा ओलांडला असतानाच आज ग्रामीण रुग्णालयाच्या दारातच दुर्दैवी प्रकार घडला. रुग्णालयाच्या समोर व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन अभावी एका कोरोना रुग्णाने रिक्षा मध्येच जीव सोडला. तब्बल तीन तास ग्रामीण रुग्णालय मेढाच्या पोर्चमध्ये रिक्षात कोरोना रुग्णाचा मृतदेह पडलेला होता. तेथूनच लोकांची ये-जा सुरू होती. तरीही रुग्णायल प्रशासनाचे त्याकडे दूर्लक्ष होते. 


मेढ्यात व्हेंटिलेटर अभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. मृत युवक हा मजूर होता. गेल्या काही दिवसांपासून त्याला कोरोनाची बाधा झाली होती. श्वसनाचा त्रास वाढल्याने आणि व्हेंटिलेटरची गरज असल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने त्याने रुग्णालयाच्या दारात रिक्षातच अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयाच्या समोर तीन तास हा मृतदेह पडून होता.


रुग्णालयासमोर एका कोरोना रुग्णाने जीव सोडला तरीही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याकडे दूर्लक्ष केले. मेढ्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आरोग्य विभाग गंभीर नाही. त्यामुळे कोरोनाने स्थिती अधिक गंभीर होत आहे, असा आरोप नागरिकांतून होत आहे. तसेच रुग्णालयाच्या दारात रुग्णांचा मृत्यू होत आहेत. आतातरी लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाला जाग येणार का ? असा सवाल करत प्रशासनाने तात्काळ अद्यावत यंत्रणा उभारावी, अशी मागणी होत आहे.


Previous Post Next Post