सरळमार्गी, अभ्यासु कॉम्रेड चांद भाई शेख यांना अखेरचा लाल सलाम

 


स्थैर्य, सातारा, दि. ०३ : पांढरा शुभ्र सदरा, पायजमा, डोक्यावर पांढरी टोपी आणि हातात काठी घेतलेले वयोवृद्ध ग्रहस्थ सातत्याने सातारच्या रस्त्यावर फिरत असत. सतत चौकस नजर घेऊन ते नेहमीच आपल्याला जे वाटतंय तो हेतू साध्य करत असत. कधी ते सातारच्या राजवाड्यावर असलेल्या सर्व श्रमिक संघाच्या कामगार युनियनच्या कार्यालयात कार्यकर्त्यांशी चर्चा करत असलेले दिसायचे. तर कधी तेथेच वाचन करीत असलेले दिसायचे. नेहमी फिरणे हा त्यांचा एक छंद होता. सातारच्या निवडक कार्यकर्त्यांच्या घरी ते नियमीत जात असत. अलीकडे त्यांच्या सातारा अर्कशाळा नगर मधील रहिवासी असलेल्या मुलाकडे राहायला असत. त्यावेळी पासून ते गेली साधारणपणे पंधरा ते सोळा वर्षे आमच्या घरी सकाळी नियमित येत असत. सकाळी पेपर वाचणे हा त्यांचा छंद. आमच्या घरी पेपर वाचून पूर्ण करत. त्याचबरोबर माझ्याकडे येत असलेली वैचारिक मासिके, साप्ताहिके ते वाचीत असत अनेक पुस्तके त्यांनी वाचली आहेत. जिवनमार्ग, लाल निशाण, युगांतर, परिवर्तनाचा वाटसरू, साप्ताहिक साधना, प्रबोधन ज्योती, सम्यक विद्रोही हि नियतकालिके त्यांना आमच्याकडे वाचायला मिळत.


तर हे असे साधे वागणारे व्यक्तिमत्व म्हणजे कॉम्रेड चांद भाई शेख.

कॉम्रेड चांद भाई शेख यांचे संपूर्ण नाव चंदुलाल रसूल शेख. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील औंध येथील रहिवासी आपल्या मुलांना त्यांनी अतिशय खडतर अशा परिस्थितीतून शिकवले. त्यांची मुलेही त्याला जागली आणि त्यांनी उच्च शिक्षण घेतले. राष्ट्रसेवा दलाच्या खटाव येथील माजी आमदार केशवराव शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शाखेत ते नियमित जात असत. सातारा हुन मुंबईला ते आपल्या तरुण वयात गेले. तेथे त्यांनी सुरुवातीला मराठा या दैनिकात कंपोझिटरचे काम केले. अर्थात जुन्या मुद्रण प्रेस मध्ये त्यांनी खिळे जुळवण्याचे काम केलेले आहे. आचार्य अत्रे यांच्याशी त्यांचा त्यावेळी निकटचा संबंध आला. आचार्य अत्रे यांच्या गाडीवरही ते चालक वरून काम करीत असत. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्यावेळी झालेल्या आंदोलनात महाराष्ट्रभर शाहीर अमर शेख, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, तसेच आचार्य अत्रे, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केलेल्या झंझावाती दौर्‍यात त्यांच्या वाहनाचे सारथ्य चांद भाई शेख यांनी केले आहे. शाहीर अमरशेख यांच्या बरोबर त्यांनी काही गीतेही सादर केली आहेत. त्यांनी स्वतः काही कवने लिहिली आहेत. हिंदी गीतकार कैफी आझमी अर्थात बाबा आझमी यांच्यासमवेत त्यांनी ईप्टामध्येसुद्धा कार्य केले आहे. परंतु त्यांनी अखेरच्या काळापर्यंत या मान्यवरांबरोबर मी होतो याचा जरूर अभिमान बाळगला मात्र त्याचा कधीही फायदा मात्र स्वतःच्या आयुष्यात घेतला नाही. मुंबईहून काही कारणाने ते पुन्हा सातारा येथे आल्यानंतर सातारा मध्ये एसटी चालक म्हणून सेवेत लागले. तेथे इंटक या कामगार संघटनेत कार्यरत होते. एसटीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते सातारा येथेच राहू लागले आणि साताऱ्यातील अनेक पुरोगामी व डाव्या चळवळीतील नेते व कार्यकर्त्यांच्या समवेत त्यांनी अनेक संघर्षात सहभाग नोंदवला आहे. अलीकडच्या काळात चाललेल्या आर्थिक धोरणांच्या बदलासंदर्भात ते नाराज होते आणि त्यांनी त्यासंदर्भात वेळोवेळी बोलूनही दाखवले आहे. विदर्भातले सुप्रसिद्ध अर्थ तज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांच्याशी त्यांनी अर्थकारणावर केलेली चर्चा महत्त्वाची होती.


वयाच्या पन्नाशीनंतर त्यांनी कुराण समजून घेण्यासाठी अरेबिक भाषा व्याकरणासहित शिकली आणि कुराणाचे वाचन त्यांनी एक अभ्यासक म्हणून केले. कुराणातील आयातींचा ते अर्थ सांगत असत. इस्लाम हा नेहमीच सत्याने जा असे सांगतो आणि सत्याच्या मार्गाने जाणाऱ्यांच्यासाठी हाफिताब आहे तो कोणत्याही एका धर्माचा नाही तर सर्व धर्मियांसाठी व मानवांसाठी हा कल्याणाचा मार्ग आहे असे त्यांचे मत होते.


आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या भारत सरकारने घेतलेल्या कर्जा संदर्भात व अन्य कर्जे, नोटाबंदी या संदर्भात ते नेहमीच काळजीने बोलत असत. देश आर्थिक कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. अमेरिकेकडे देश गहाण पडलेला आहे. देशाने आता आम्ही काही कर्ज देवू नाही असे सांगून दिवाळखोरी जाहीर करून टाकावी व नव्याने चलन सुरू करावे असे त्यांचे मत होते. आणि हे ते आग्रहाने अनेकांना बोलून दाखवत असत. याविषयी तर ते अतिशय नाराजीने बोलत असत. कामगार युनियन म्हणजे दुकानदारी झालेली आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते. आंदोलन, मोर्चे, निदर्शने परिवर्तनाचा मार्ग नाही तर क्रांती झाली पाहिजे. आमच्याकडे किंवा कुणाकडे कधी गेले की ते नेहमी सांगत की डाव्या चळवळीची आंदोलने ही कुचकामी आहेत त्यांनी मार्ग बदलला पाहिजे व पर्याय नीट दिला पाहिजे. 


जेवणानंतर स्वतःचे ताट स्वतः धुणारे, स्वतःचे कपडे स्वतः धुणारे, शिस्तप्रिय व नीटनेटके राहणारे शेख चाचा आता पुन्हा घरी येवू शकणार नाहीत. अगदी दवाखान्यात नेत असताना सदरा, लेंगा स्वत:च घातला असे निसार या मुलाने सांगितले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

विजय मांडके, सातारा
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.