" लता : वय वर्षे 91 आणि 19 ! "

स्थैर्य, दि.२८: आपल्या देशाच्या इतिहासातल्या एका सुमधुर 'सांस्कृतिक घटनेचा' आज 91 वा वर्धापनदिन ! 'लता मंगेशकर' असं नामाभिधान लाभलेली ही सुरेल घटना! 


लतादीदींचा वाढदिवस म्हणजे मानवी कंठातील परमोच्च पावित्र्याचा आणि मांगल्याचा वाढदिवस! सुगम संगीतातल्या 'सुगमतेचा'..सहजतेचा, निर्दोष सुरेलतेचा आणि अनुपमेय गोडव्याचा जन्मदिवस! 

हा आनंददायी दिवस लताजींनी आत्तापर्यंत 91 वेळा अनुभवला असला तरी 2020 च्या 28 सप्टेंबरचं महत्व आगळंच आहे... 'Age is just a number...' हे खरं मानलं तरी 'आकडे बोलके असतात' हे ही सत्यच. आज 'केक'वरचा '91' हा आकडा पाहताना, लताजींच्या डोळ्यांसमोर, अंकांची अदलाबदल होऊन '19' ही संख्या तरळणं स्वाभाविक आहे. कारण आज 91 व्या वर्षी दीदी ज्या शिखरावर विराजमान आहेत, ते शिखर सर करायला खरा आरंभ झाला तो वयाच्या '19'व्या वर्षी.. 1948 साली! आणि 19 वर्षं पूर्ण होताच या आरोहणानं खरी गती घेतली....1949 या वर्षी! एखादा अग्निबाण प्रचंड वेगानं आकाशात झेपावतो तद्वतच लतानं झेप घेतली आणि स्वरनभात सर्वोच्च अढळ स्थान प्राप्त केलं. या वर्षात तिनं 'सोलो' गीतांचं शतक मारलं... आणि या शतकी कामगिरीतले काही 'षटकार-चौकार' तर केवळ अद्वितीय ! लताच्या प्रदीर्घ स्वरयात्रेत 'माईलस्टोन' ठरलेली अनेक गाणी या वर्षात निर्माण झाली....

तिला 'Classes' आणि 'Masses' मधे मान्यता मिळवून देणारं 'आएगा आनेवाला', तिचा आवाज प्रत्येक 'झोपडीपर्यंत' पोहोचवणारं 'चले जाना नहीं नैन मिलाके', 'तिच्या आवाजातील pathos ला पुरेपूर वाव देणारी 'साजन की गलियाँ छोड चले' आणि 'बहारे हमको ढुँडेगी' ही गाणी, तिच्या स्वरातला मिस्कीलपणा उजागर करणारं 'लारालाप्पा लारालाप्पा', तिच्या अणकुचीदार आवाजातल्या जागांनी घायाळ करणारं 'तुम्हारे बुलानेको जी चाहता है' ही सगळी जादू 19 वर्षांच्या लताची. 'येणारी अनेक वर्षं आम्ही तुम्हाला अवीट माधुर्यच्या गीतांची सफर घडवणार आहोत' असं आश्वासन लता-सी.रामचंद्र जोडीनं दिलं ते याच वर्षी... 'पतंगा'मधल्या 'दिलसे भुला दो तुम हमें' या गाण्यातून. नौशादांचं 'दुलारी' नावाचं नऊ 'लता'गीतांनी भरलेलं मधाचं पोळं रसिकांना लाभलं ते देखील याच वर्षी! 'उठाए जा उनके सितम', 'कोई मेरे दिलमें खुशी बनके आया', 'डरना मोहोब्बत कर ले' ही 'अंदाज' मधली नौशादगीतं, हे सुध्दा याच वर्षीचं देणं! आणि याच वर्षी बरसली सप्तसुरांची 'बरसात!' शंकर-जयकिशन यांच्या 'बरसात' मधली 'दहा लतागाणी' हा एका (किंवा त्यापेक्षा जास्त) स्वतंत्र लेखाचा विषय आहे. 'बरसातमें हमसे मिले तुम, जिया बेकरार हैं, हवामें उडता जाए, मुझे किसीसे प्यार हो गया, बिछडे हुए परदेसी, पतली कमर है....' जणू दहा अनमोल रत्नांनी मढवलेला हा हार लतानं 'संगीत देवतेच्या' कंठी अर्पण केला. शिवाय, 'दुर्मिळ पण दर्जेदार' पध्दतीच्या गाण्यांची आवड असणाऱ्या चोखंदळ रसिकांसाठी 'चकोरी', 'शायर', 'गर्ल स्कूल', 'पारस', 'भोली' अशा सिनेमातली अप्रतिम गाणी आहेतच. त्यावर्षी लताचं गाणं ऐकून संगीतकारांना जो हर्षोल्लास झाला असेल त्याची कल्पनाच केलेली बरी! तब्बल वीस संगीतकारांनी या एका वर्षात लताकडून गाणी गाऊन घेतली. 

हे अद्भुत कर्तृत्व तिनं गाजवलं फक्त 19 वर्षांची असताना. तिचं गाणं हा हिंदी चित्रसंगीताच्या सुवर्ण मंदीराचा कळस आहे. पण या कळसाची मुहूर्तमेढ रोवली गेली ती 1949 साली! या गोष्टीला आता 71 वर्षं झाली. '19' चं '91' वय झालं . आजच्या घडीला, लतादीदी आणखीनच उंच स्थानावर स्थित आहेत. माझा एक मित्र म्हणायचा की, "लताचं वय आणि तिच्या 'आवाजाचं वय' यांचं प्रमाण 2ः1 आहे. म्हणजे चाळीसाव्या वर्षी लताचा आवाज 'वीस' वर्षाच्या मुलीसारखा भासतो तर साठाव्या वर्षी तो 'तीस'चा वाटतो!" याच भाषेत सांगायचं तर लताजींच्या कारकीर्दीतलं एक वर्षं आणि त्यातून प्राप्त होणारं 'कीर्तीवैभव' यांचं प्रमाण 1ः20 असं आहे. म्हणजे त्यांची कारकीर्द 50 वर्षांची असेल तर त्यांचं 'कीर्तीवैभव' तब्बल 1000 वर्षांचं आहे.

त्यामुळेच आजही... पार्श्वगायनाच्या प्रवाहातून स्वतःला अलग केल्यानंतर अनेक वर्षांनीही... दीदींनी सोशलमिडियावर एखादी पोस्ट केली की काही मिनिटांतच हज्जारो लाईक्स, कॉमेंटस् येतात. कुठल्याही थोर कलाकाराची पुण्यतिथी असो, देशातली एखादी महत्वपूर्ण घटना असो.. दीदी त्यावर भाष्य करुन आपल्या सजगतेचं प्रत्यंतर देतात. अती महत्वाच्या प्रसंगी स्वतःच्या आवाजात एखादा 'अॉडियो मेसेज' रेकॉर्ड करुन त्या शेअर करतात तेव्हा आमच्यासारख्या चाहत्यांना किती आनंद होतो.. दीदींची प्रत्यक्ष भेट झाल्यासारखा ! 91 व्या वर्षी 'न्यूमोनिया'सारख्या मातब्बर शत्रूवर मात करुन त्यांनी आपल्या विजीगिषु वृत्तीचं दर्शन घडवलं आहे. आयुष्यभर सोबत करत असलेली त्यांची हीच वृत्ती त्यांना वयाचं शतक पूर्ण करायला सहाय्यभूत ठरेल. 

दीदी, जीवेत् शरदः शतम्!

- धनंजय कुरणे


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya