देशी वृक्षसंपदेबाबत साक्षरता वाढायला हवी : डॉ . कुंडलीक मांडवे

 

स्थैर्य, खटाव, दि.२८: सहजतेने भटकायला निघालो तर आपल्याला वाटतं की काहीतरी फळ चाखावे , असे वाटत असेल तर त्यासाठी फक्त देशी झाड उपयोगी असतात. उपयोगी झाड लावणे नितांत गरजेचे असताना आपण परदेशी शोभीवंत झाडे लावल्यामुळे काहीच खायाला मिळत नाही आणि मग जंगल आणि माणूस अस नातं तुटत चाललंय की काय ? ही भिती व्यक्त करत ,देशी वृक्षसंपदेबाबत साक्षरता वाढायला हवी असे प्रतिपादन प्रयास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ . कुंडलीक मांडवे यांनी केले.

येथील स्वामी समर्थ मंदीर परिसरात प्रयास सामजिक संस्थेच्या वतीने नक्षत्रातील सत्तावीस वृक्षांची लागवड करण्यात आली. प्रदिप शेटे,शरद गोडसे,प्रा.अजय शेटे,संतोष सुतार आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी डॉ. मांडवे पुढे म्हणाले की, दुष्काळी भागातील नैसर्गिक जोपासना करीत देशी झाडांची लागवड करणे क्रम प्राप्त आहे. तरच पुढील काही वर्षात या भागाचा निश्चितच कायापालट होऊन ही भूमी सुजलाम- सुफलाम होईल .झाडे लावताना प्रत्येकाची मतभिन्नता दिसून येते. त्यामुळे देशी का परदेशी झाडे लावायची या विवंचनेतच वेळ आणि काळ निघून जात आहे. प्रत्येक झाडामधूनच ऑक्सिजन वायू देणे हा एक भाग असला तरी इतर भागांमधून अनेक जीवसृष्टींना वाचवण्याचे काम हे वृक्ष करीत असतात. मुळातच या नक्षत्रातील वनस्पती आपल्या जीवसृष्टीला पोषक अशा ठरणाऱ्या आहेत. एक झाड लावताना दुहेरी फायदे बघूनच रोपांची लागवड केली आहे. निसर्गाला जर आपण धोका पोहचवला तर निसर्गच आपल्याशी दगाफटका करू शकतो. त्यासाठी आपणच निसर्गाची काळजी घेणे महत्वाचे आहे. शाळकरी मुलांना कचरा म्हणजे झाडांची वाळलेली पाने, गवत असे चूकीचे शिक्षण दिले जात आहे. हे वेळीच थांबवणे गरजेचे आहे कारण हीच वाळलेली पानं, फूलं व गवत हे वनस्पती स्वतःसाठी खत म्हणून निर्मिती करतात.

याप्रसंगी प्रास्ताविकामध्ये संस्थेचे उपाध्यक्ष मुन्ना मुल्ला म्हणाले, गत सात वर्षापासून प्रयास सामाजीक संस्थेच्या माध्यमातून प्रभाग स्वच्छता, नदी पूर्णभरण, वृक्ष लागवड व संगोपण, कचरा निर्मुलन, घरगुती खतनिर्मिती आदिसह कार्य संस्थेच्या माध्यमातून केले असल्याची विविध पर्यावरणपूरक माहीती यावेळी त्यांनी दिली. तसेच वडूजमध्ये चार, सिद्धेश्वर कुरोली येथे एक, मायणी येथे एक नक्षत्रवन उभारून तालुक्यात देशी झाडांचे महत्व पटवून देणार असल्याचा मानस ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यामुळे किमान येणारी नवीन पिढी तरी पर्यावरण साक्षर झालीच पाहीजे. यासाठी प्रयत्न करणे नितांत गरजेचे आहे. निसर्ग वाचवायचा असल्यास तो वाचता आला पाहिजे हे सुत्र सर्वासमोर आले पाहिजे . यासाठी आम्ही संस्थेचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहोत.


विशाल भागवत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन मयुरेश शेटे तर आभार रोहित शहा यांनी मानले. यावेळी प्रदीप शेटे, प्रा. अजय शेटे, विशाल भागवत, धनजंय जाधव यांच्यासह कार्यक्रमास प्रयास सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya