महाबळेश्‍वर ट्रेकर्सच्या जवानांनी वाचवले दरीत पडलेल्या युवकाचे प्राण



स्थैर्य, पांचगणी, दि. 27 : महाबळेश्‍वर-प्रतापगड मुख्य घाटरस्त्यावर खोल दरीत सुमारे तीनशे फुटांवर तब्बल अठरा तासांहून अधिक काळ अडकलेल्या एका युवकास महाबळेेश्‍वर ट्रेकर्सच्या जवानांनी रविवारी सकाळी सुखरूप बाहेर काढले. या युवकाचे नाव अमृत रामचंद्र रांजणे, वय-35, रा. दिघी, नवी मुंबई असे असून त्याचे मूळ गाव रांजणी, ता. जावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


याबाबत अधिक माहिती अशी, अमृत रांजणे हा युवक दिघी नवी मुंबई येथील एका कंपनीमध्ये कामाला असून तो महाड येथे आपल्या कंपनीच्या सहकार्‍यांसोबत गेले पाच दिवस कंपनीच्या कामानिमित्त आला होता. शनिवारी सुट्टी असल्याने दुपारी अमृत रांजणे हा त्याचे मूळ गाव असलेल्या रांजणी, ता जावली येथे जाण्यासाठी महाड येथून पोलादपूर येथे आला व पोलादपूर येथून एका खासगी ट्रॅक्सने महाबळेेश्‍वरकडे निघाला होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आंबेनळी घाटरस्त्यावर असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी त्याने ट्रॅक्स थांबविण्यास सांगून तो ट्रॅक्समधून उतरला. ज्या टॅ्रक्सने तो आला ती ट्रॅक्स तेथून निघून गेली. मात्र हा युवक त्या ठिकाणी असलेल्या एका संरक्षक कठड्यावर बराच वेळ बसून होता. दरीमध्ये वाकून बघण्याच्या प्रयत्नात त्याचा पाय घसरला व तो थेट झाडाझुडपातून सुमारे तीनशे फूट खोल दरीत घसरत गेला. रात्री घाटरस्त्यावर अंधार, धुके असल्याने आवाज देऊन देखील त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. संपूर्ण रात्र अंधाराच्या काळोख्यात घनदाट जंगलात काढली.





रविवारी सकाळी या ठिकाणी एक पर्यटक दांपत्य ‘सेल्फी’ घेत होते. त्यांना ‘वाचवा.. ‘वाचवा’ असा आवाज दरीतून ऐकू आला. या दांपत्याने क्षणाचाही विलंब न करता घाटरस्त्यावर असलेल्या फलकावरून महाबळेेश्‍वर पोलिसांशी संपर्क साधला. महाबळेेश्‍वर पोलिसांनी महाबळेेश्‍वर ट्रेकर्सच्या जवानांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेतली. याआधी देखील या ठिकाणीच काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीला जीवंत वाचविण्यात ट्रेकर्सच्या जवानांना यश आले होते. याच ठिकाणी ही व्यक्ती पडल्याचा अंदाज ट्रेकर्सच्या जवानांनी बांधून दोरखंडाच्या सहाय्याने रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास महाबळेेश्‍वर ट्रेकर्सचे जवान नगरसेवक कुमार शिंदे, संदीप जांभळे, जयवंत बिरामणे, अमित कोळी यांनी धाडसाने खाली उतरण्यास सुरुवात केली. एका तासांच्या अथक परिश्रमानंतर या युवकास सुमारे तीनशे फूट खोल दरीमधून सुखरूप वर काढण्यास यश आले.


महाबळेेश्‍वर ट्रेकर्सचे अध्यक्ष अनिल केळगणे, सुनीलबाबा भाटिया, सुनील वाडकर, दिनेश झाडे, नितीन वाडकर, अनिकेत वागदरे, मनीष झाडे आदींनी मदतकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अब्दुल बिद्री, प्रताप लोखंडे, प्रशांत पवार, भुजंग काळे आदी उपस्थित होते.



Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya