फलटणमध्ये विद्युत स्मशानभूमी करा : नगरसेवक सचिन सूर्यवंशी - बेडके


स्थैर्य, फलटण : फलटण शहरामध्ये सध्या अंत्यसंकरासाठी स्मशानभूमी कमी पडत असल्याने कोरोनाच्या काळात कोळकी ग्रामपंचायतीची रावरामोशी पुलाच्या जवळ असलेल्या स्मशानभूमीचा वापर करण्यात येत आहे. तरी आगामी काळात फलटण नगरपरिषदेची अत्याधुनिक विद्युत स्मशानभूमी तयार करण्यात यावी. त्या सोबतच आता असलेल्या स्मशानभूमी येथे असणारी संख्या सुद्धा वाढवण्यात यावी अशी मागणी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे नगरसेवक सचिन सूर्यवंशी - बेडके यांनी केलेली आहे. 


फलटण शहर व परिसरातील नागरिकांची वाढलेली लोकसंख्या विचारात घेता या अग्निसंस्कार करता येऊ शकणाऱ्या एकाच स्मशानभूमी ऐवजी जास्त स्मशानभूमीची उपलब्धता असणे अत्यंत आवश्यक आहे. या करिता फलटण नगरपरिषदेच्या मालकीच्या व काही समाजांच्या पारंपारिक अनेक जागा अशा आहेत, जिथे नवीन स्मशानभूमीची उभारणी करण्यात येऊ शकते. शिंगणापूर रस्त्यावर ओढ्या लगतचे जुने महीला वसतीगृह व त्याच्या पिछाडीची सुमारे तीन एकर जागा ही फलटण नगरपरिषदेच्या मालकीची आहे. यामधील मोकळ्या जागेत जास्तीत जास्त १ एकरामध्ये स्मशानभूमीची उभारणी करता येऊ शकते. त्या सोबतच ओढ्याच्या कडेला विद्यानगर लगत अशीच तीन ते चार एकर जमीन फलटण नगरपरिषदे करीता आरक्षित करण्यात आली आहे. सदरच्या जागेत सुध्दा स्मशानभूमीची उभारणी करता येऊ शकते.शुक्रवार पेठेतील वेलणकर दत्तमंदिरचे पिछाडीस बाणगंगा नदी लगत जे मुस्लीम कब्रस्तानालगत दहावा शेड आहे त्याचे परिसरात स्मशानभूमीची उभारणी करता येऊ शकते. फलटण - सातारा रस्त्यावरील बाणगंगा नदी वरील पुलाचे लगत उत्तर व दक्षिण बाजूस स्मशानभूमीची उभारणी करता येऊ शकते. रस्त्यावर पुल ओलांडल्यावर त्याचे लगत वडार समाजातील लोकांची स्मशानभूमी साठीची पारंपारिक एक एकर पेक्षा जास्त जागा असून, या समाजातील स्मशानभूमीची नव्याने पुनर्र‌उभारणी करण्याची तयारी समाजातील काहींनी दर्शवली असून ते सुद्धा ही जागा सदरच्या प्रस्तावासाठी फलटण नगरपरिषदेस उपलब्ध करून देतील असा मला विश्वास आहे. या जगावर फलटण नगरपरिषदेने तातडीने नव्याने अत्याधुनिक विद्युत अश्या स्मशानभूमीची उभारणी करावी, असेही सचिन सूर्यवंशी - बेडके यांनी स्पष्ट केले आहे. 


तसेच ही उभारणी करताना किमान एका ठिकाणी विद्युत, सोलर, गॅसवरील किंवा डिझेल वर चालणारी अग्नीदाहिणी उभारण्यात यावी. म्हणजे पुढील काळात पर्यावरणाचा ऱ्हास टाळता येऊ शकतो व सध्याच्या कोरोना महामारी सारख्या किंवा इतर गंभीर आजाराने मृत्यू पावलेल्या व्यक्तींवर योग्य प्रकारे शास्त्रीयदृष्ट्या अंत्यसंस्कार करता येऊ शकतील. सदरच्या अर्जाची गंभीरपणे तातडीने दखल घेऊन तत्काळ वरील संबंधीचा महाराष्ट्र शासनाकडे योग्य त्या कार्यवाहीसाठी फलटण नगरपरिषदे मार्फत प्रस्ताव पाठविण्यात यावा अशी मागणी हि नगरसेवक सचिन सूर्यवंशी - बेडके यांनी केलेली आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya