आशालता ताईंच्या आत्म्यास शांती लाभो

 

स्थैर्य, सातारा, दि.२४: पूर्वीपासुन कुठलाही कलाकार सातारला आला की लै भारी वाटायचं ! शुटिंग वगैरे होत नसत इकडे त्याकाळात.. पण नाटक किंवा सहज फिरायला-मित्रमंडळींना भेटायला एखादा अभिनेता-अभिनेत्री कुणीही आलं आणि सातार्‍यातल्या रस्त्यावर फिरताना दिसलं की उगाचंच अभिमानानं छाती भरून यायची. आमच्या अरूणकाकांना - अरूण गोडबोलेंना भेटायला डाॅ. काशिनाथ घाणेकरांपासून पं. भिमसेन जोशींपर्यन्त आणि मोहन जोशींपासून प्रशांत दामलेंपर्यन्त कलाकार येतात याचं खूप अप्रूप वाटे ! अरूणकाकांनी 'कशासाठी प्रेमासाठी' हा अस्सल सातारी सिनेमा प्रोड्यूस केला, तेव्हा आम्ही आयुष्यातलं पहिलं शुटिंग पाहिलं.. गर्दी करकरून. अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कामानिमित्त डाॅ. नरेंद्र दाभोळकरांच्या घरी निळू फुले, डाॅ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर आले की आम्ही ऑटोग्राफ घेण्यासाठी दारात रांगा लावायचो. 

एकदा सातार्‍यात शुटिंग सुरू असताना विनय आपटेंना हार्टॲटॅक आला होता ते कळल्यावर जेवत्या ताटावरुन उठून धावत मी संजीवनी हाॅस्पीटलला गेलो होतो.. तिथल्या ओळखीच्या डाॅक्टरांना भेटून सतत विचारपूस करत होतो. माझ्या सातार्‍याची, आपल्या गांवातली-आपल्या मातीतली चांगली आठवण त्या कलाकाराच्या मनात रहावी असं मनापासून वाटायचं... आजही वाटतं !

पण आज अतिशय संमीश्र भावना मनात आहेत. आशालता वाबगांवकर ताई सातार्‍याजवळ 'आई माझी काळूबाई' या मालिकेचं शुटिंग करत असताना कोरोनाबाधित झाल्या आणि सातार्‍यातल्या 'प्रतिभा हाॅस्पीटल'मध्ये ॲडमिट आहेत, हे कळल्यापासुन मन थार्‍यावर नव्हतं... त्याचवेळी माझ्याही 'मुलगी झाली हो' या सिरीयलचं शूटींग वाईजवळ सुरू असल्यानं बघायलाही जाता येत नव्हतं... पण माझे अत्यंत घनिष्ट मित्र आणि तज्ञ डाॅक्टर सोमनाथ साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत हा मोठा दिलासा होता ! माझे वर्तमानपत्र माध्यमातले मित्र दिपक प्रभावळकर अधूनमधून फोन करुन परीस्थितीबद्दल कल्पना देत होते.. कालपासूनच काहीतरी विपरीत घडणार याची चाहूल लागली होती.

...आणि ती नको असलेली बातमी आली ! मन विषण्ण झालं !! सातारा आणि मराठी कलाकार यांच्याशी संबंध असणारी माझ्या आयुष्यातली दूसरी वाईट घटना.. पूर्वी वाईवरून मुंबईला जाताना भक्तीताई बर्वेंचा झालेल्या अपघातानंतर पहिल्यांदाच अशा मनस्थितीला तोंड देत होतो !

मराठी नाट्य-चित्रपट सृष्टी हे आता माझं कुटूंब आहे. माझ्या कुटूंबातली माझ्या आईसारखी असलेली व्यक्ती माझ्या गांवात शेवटचा श्वास घेते हे खूप खूप वेदना देणारं होतं. कोविडमुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्काराबाबत देशभर खूप संदिग्ध वातावरण आहे. बर्‍याच ठिकाणी मृतदेहाची विटंबना होत असलेल्या बातम्या येत असतात. त्यामुळे इंडस्ट्रीतून त्याबाबत विचारणा करणारे फोन मला येऊ लागले. मी सर्वांना आश्वस्त केलं की महाराष्ट्रातली अत्यंत आदर्श - सुव्यवस्थित - स्वच्छ आणि शिस्तबद्ध समजली जाणारी कैलास स्मशानभूमी कोविड रूग्णांसाठी उपलब्ध करुन देऊन राजेंद्र चोरगे यांनी समाजासाठी खूप मोठं आणि मोलाचं काम केलं आहे. महाराष्ट्रातली ही एकमेव खाजगी समाजसेवी संस्थेतर्फे चालवली जाणारी स्मशानभूमी असावी. इथे सातार्‍यात कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्या रूग्णांच्या मृतदेहाचा नीट आदर ठेवून, संपूर्ण काळजी घेऊन अंत्यसंस्कार केले जातात.

'कैलास स्मशानभूमी'नं माझा विश्वास सार्थ ठरवला. मराठी नाटक-सिनेमा-मालिकांमधून गेल्या चार पिढ्यांमधल्या रसिकांचे मनोरंजन करणार्‍या आशालता वाबगांवकरांसारख्या अत्यंत प्रतिभावान, दिग्गज अभिनेत्रींचे विशेष इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. राजेंद्र चोरगे यांनी स्वत: उपस्थित राहून सर्व ती मदत करत सुयोग्य ती काळजी घेतली...यावेळी अलका कुबल, समीर आठल्ये, बाळासाहेब कदम उपस्थित होते. सातारकर नागरीकांना कैलास स्मशानभूमी आणि राजेंद्र चोरगे यांच्याविषयी कायम आदरच वाटेल ! मन:पूर्वक धन्यवाद !!

आशालता ताईंच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

- किरण माने.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya