तोडग्यासाठी खल : मराठा आरक्षण; फेरविचार याचिका की अध्यादेश... सर्वसहमतीने निर्णय, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत धोरण

 

स्थैर्य, मुंबई, दि.१४: मराठा आरक्षणास दिलेली अंतरिम स्थगिती निरस्त करण्यासाठी फेरविचार याचिका दाखल करायची की अध्यादेश काढायचा यासंदर्भात विरोधी पक्षासह संबंधित विविध संस्था, संघटना तसेच विधिज्ञ यांच्याशी चर्चा करून सर्वसहमतीने निर्णय घेण्याचा निर्णय रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बिहारच्या दौऱ्यावर आहेत. ते मुंबईत परतल्यावर विरोधी पक्षनेत्यांसोबत पुन्हा बैठक होईल. त्यात मराठा आरक्षणासंदर्भात फेरविचार याचिका दाखल करायची की अध्यादेश काढायचा यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. बैठकीस मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अॅड. अनिल परब, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होते.

विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश, नोकर भरती विषयाचाही आढावा

अंतरिम स्थगितीमुळे विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश व भरती प्रक्रिया यांच्या अनुषंगाने झालेल्या परिणामाबाबत विस्ताराने आढावा घेण्यात आला. विद्यार्थी व उमेदवारांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये यासाठी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

मराठा समाजाने संयम राखावा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

१ मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमांवरून संवाद साधला. ते म्हणाले, राज्यातील सर्व पक्षांनी एकमताने मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आरक्षण दिले होते. मागील सरकारने दिलेले वकील कायम ठेवतानाच त्यांना अतिरिक्त वकील देण्यात आले होते.

२ इतर राज्यांप्रमाणे मराठा आरक्षणाची सुनावणी मोठ्या बेंचसमोर व्हावी अशी मागणी राज्याने केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करताना मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस अंतरिम स्थगिती दिली. इतर राज्यांच्या बाबतीत अशी स्थगिती दिलेली नाही.

३ न्यायालयाच्या या निकालावर काय करता येईल यासाठी राज्य शासन विचार करीत असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही बोलणे झाले आहे. त्यांनीदेखील यात कुठलेही राजकारण न आणता सरकारच्या बरोबर असून सहकार्य करू, असे सांगितले आहे. मराठा समाजाने संयम बाळगावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Previous Post Next Post