राष्ट्रजागरण'मध्ये तरुणांना उद्यमशील बनण्याचे आवाहन मिलिंद कांबळे, प्रकाश राणे यांचे विचारमंथन

 

स्थैर्य, दि.३०: आपल्या देशातील एक मोठा समुदाय आजही उद्योग, व्यवसायापासून कोसो दूर आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी येत्या काळात देशातील दलित, आदिवासी व अन्य मागासवर्गीय घटकातील तरुणांचे जाळे निर्माण करून त्यांच्यात उद्ममशीलता निर्माण करणार असल्याची ग्वाही ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ (डिक्की)चे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी दिली. तसेच "उद्योग' हा कुठल्याही राष्ट्राचा भक्कम पाया असतो. आपला भारत हा तरुणांचा देश असून आपला देश प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी तरुणांमध्ये आता उद्योजकता निर्माण करण्याची गरज आहे’’ असे 'एबीएम नॉलेजवेअर लि. मुंबई'चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश राणे यांनी प्रतिपादन केले. 

सा. विवेकच्या ‘राममंदिर ते राष्ट्र मंदिर’ ग्रंथानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेच्या चौथ्या पुष्पाच्या आॅनलाइन व्यासपीठावरून ते बोलत होते. बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ६ वाजता ‘उद्यमशील भारतासाठी’ या विषयावर हे विचारमंथन आयोजित करण्यात आले होते.

देशात 'डिक्की'चे मोठ्या प्रमाणात कार्य सुरू आहे, यासंबंधी उभारलेली यंत्रणा आणि भविष्यातील वाटचाल या संदर्भात बोलताना मिलिंद कांबळे म्हणाले, "डिक्की ही संस्था संपूर्ण देशभर कार्यरत असून आतापर्यंत आम्ही १ लाख उद्योजकांपर्यंत पोहोचलो आहोत." त्यांनी हैदराबाद आणि दिल्ली येथे संस्थेने केलेल्या एका प्रयोगशील कामाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हैदराबाद शहरात ड्रेनेज सफाई ही एक मोठी समस्या बनली होती. नाल्यात उतरून काम करणार्‍या तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. या संदर्भात आम्हाला येथे काम करण्याची संधी मिळाली. आम्ही येथे मिनी जेट्टिंग हे यंत्र विकसित केले. यात कामगारांंना कंत्राट देण्यात आले. पुढे झाले असे की, सफाई कामगार उद्योजक बनले आणि त्यांचे आर्थिक, सामाजिक जीवनमान उंचावले. अशीच कथा दिल्लीतही घडली.’’ 'स्टँडअप इंडिया' योजनेमुळे हा प्रयोग यशस्वी होऊ शकला असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

आज देशभरात स्टँडअप इंडिया, मुद्रा, व्हेंचर कॅपिटल अशा केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून हजारो दलित तरुण उद्योजक बनले असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रकाश राणे या वेळी म्हणाले, ‘‘राष्ट्रनिर्मितीमध्ये शिक्षक, शास्त्रज्ञ, राजकारणी आदी घटकांबरोबर उद्योजकही आपले योगदान देत असतो. यशस्वी उद्योजक होण्यासाठी सचोटी, कसोटी, हातोटी आणि मेहनत या गुणाची जशी आवश्यकता असते, तसेच अहंकार आणि स्वाभिमान, सहकार्‍यांवरचा विश्वास, निर्णयक्षमता, जोखीम स्वीकारण्याची क्षमता आणि नवतंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे आदी गुणांचा समावेश असणे आवश्यक आहे" असे राणे यांनी सांगितले.

गुरुवार दि. १ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी सहा वाजता ‘युवकांचा भारत’ या विषयावर विशेष सत्र होणार आहे. यामध्ये ‘माहिती तंत्रज्ञान आणि भविष्यातील भारत’ या विषयावर इंद्रनील पोळ, तर ‘प्रसारमाध्यमे आणि भविष्यातील भारत’ या विषयावर सिद्धराम पाटील आणि ‘सेवा कार्य आणि भविष्यातील भारत’ या विषयावर अशोक देशमाने हे आपले विचार प्रकट करणार आहेत. हे व्याख्यान सा. विवेकच्या फेसबुक पेजवरून व यूट्यूब चॅनलच्या https://www.facebook.com/VivekSaptahik/live https://youtu.be/GvbItWSUBNY या लिंकवरून पाहता येणार आहे.
Previous Post Next Post