मुंबई : एल्गार परिषदेचा समांतर तपास होणार, राज्य सरकारच्या वतीने खास चौकशी पथक नेमले जाण्याची शक्यता

 

स्थैर्य, मुंबई, दि.११: एल्गार परिषद व कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची राज्य सरकार समांतर चौकशी करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत गुरुवारी मुंबईत ज्येष्ठ मंत्र्यांची बैठक झाली. त्यात केंद्राची यंत्रणा तपास करत असताना राज्य सरकार समांतर तपास करू शकते का, याची पडताळणी करण्याचा निर्णय झाला.

पवार यांनी गुरुवारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक बोलावली होती. त्यात कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्याने खास पथक (एसआयटी) नेमावे, अशी मागणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख व डाॅ. नितीन राऊत चर्चा करतील आणि एका आठवड्यात भूमिका ठरवतील, असा निर्णय झाला. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.

राज्यालाही काही अधिकार... तज्ञांचे मत जाणून घेऊ

शरद पवार म्हणाले, कोरेगाव भीमा तपासासंदर्भात आम्ही अस्वस्थ आहोत. नक्षलवादाच्या नावाखाली विचारवंत, साहित्यिक यांना अटक केली जात आहे. आम्ही या प्रकरणाचा आढावा घेतला. याची चौकशी एनआयए करत आहे, पण राज्य सरकारलाही काही अधिकार आहेत. त्या अनुषंगाने तज्ञांचे मत घेणार आहोत. आम्हाला वाटते हा तपास योग्य दिशेने सुरू नाही, असे पवार म्हणाले.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya