नासाची चांद्र मोहीम : 2024 मध्ये 52 वर्षांनंतर प्रथमच महिला चंद्रावर पाऊल ठेवणार; 4 वर्षांच्या मोहिमेत 2 लाख कोटी रुपये खर्च होणार

 

स्थैर्य, दि.२३: अमेरिकी अंतराळ संस्था नासाने १९७२ नंतर प्रथमच चंद्रावर माणसाला पाठवण्याची योजना आखली आहे. नासाचे प्रमुख जिम ब्रिडेनस्टीन यांनी मंगळवारी याबाबतची घोषणा केली. ते म्हणाले, नासा २०२४ मध्ये चंद्रावर पहिल्यांदाच महिला आणि पुरुष अंतराळवीराला उतरवण्याची योजना आखत आहे. आम्ही चंद्रावर वैज्ञानिक शोध, आर्थिक लाभ आणि नव्या पिढीच्या संशोधकांना प्रेरणा देण्यासाठी चंद्रावर पुन्हा जात आहोत.

ब्रीफिंगदरम्यान जिम ब्रिडेनस्टीन यांनी सांगितले की, देशात निवडणूक असल्याने रकमेबाबत जोखीम आहे. अमेरिकी संसदेने डिसेंबरपर्यंत २३,५४५ कोटींची मंजूरी दिल्यास आम्ही चांद्र मोहीम प्रत्यक्षात आणू शकू. मोहिमेदरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळ यान उतरेल. ही चांद्र मोहीम ४ वर्षांत पूर्ण होईल. या मोहिमेसाठी २८ बिलियन डॉलर सुमारे २ लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. सुमारे सव्वा लाख रुपये मॉड्यूलवर खर्च होतील. ब्रिडेनस्टीन म्हणाले, या मोहिमेंतर्गत अनेक नव्या गोष्टींचा शोध घेता येईल. चंद्रावर जे शास्त्रज्ञ काम करतील ते पू‌र्वीच्या मोहिमांपेक्षा वेगळे असेल. १९६९ च्या अपोलो मोहीमेवेळी चंद्रावर पाणी नाही असेल आम्हाला वाटायचे. मात्र चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मोठ्याप्रमाणात पाणीसाठा असल्याचे आम्हाला कळले आहे. सध्या तीन लूनर लँडर तयार करण्यासाठी योजना आखणे सुरू आहे. लँडर तयार करण्यासाठी ब्लू ओरिजिन अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांची कंपनी दावेदार मानली जात आहे. दुसरे लँडर अॅलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स बनवत आहे. तर तिसऱ्या कंपनीचे नाव डायनॅटिक्स आहे. या तिन्ही कंपन्या लूनर लँडर तयार करत आहेत. या मोहिमेचे नाव अर्टेमिस आहे. हे अनेक टप्प्यात होईल. पहिला टप्पा मनुष्यविरहित ओरियन स्पेसक्राफ्टपासून नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरू होईल. मोहिमेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात अंतराळवीर चंद्राच्या आजूबाजूला फेरा मारतील. अपोलो-११ मोहीमेप्रमाणे अर्टेमिस मोहीमही एक आठ‌वडा चालणार आहे.

१९६९ ते १९७२ पर्यंत अपोलो-११ सह ६ चांद्र मोहिमा

नासानुसार, अमेरिकेने १९६९ पासून ते १०७२ पर्यंत अपोलो-११ सह ६ चांद्र मोहिमा केल्या. २० जुलै १९६९ ला अपोलो-११ मोहिमेंतर्गत पहिल्यांदाच नील आर्मस्ट्राँग, एडविन ऑल्ड्रिन हे अंतराळवीर चंद्रावर उतरले होते. अमेरिकेला या मोहिमेच्या यशावर शंका होती. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्या निर्देशानुसार, ‘इन इव्हेंट ऑफ मून डिझॅस्टर’ नावाने शोकसंदेशही तयार केला होता. मात्र ही मोहीम यशस्वी झाली. अपोलो-११ नंतर ५ चांद्र मोहिमा झाल्या. शेवटची १९७२ ला झाली.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya