वा. ना. उत्पात यांचे कोरोनाने निधन

 


स्थैर्य, पंढरपूर, दि. 28 : संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि आपल्या रसाळ वाणीने संपूर्ण महाराष्टाला भागवत कथेने मंत्रमुग्ध करणारे भागवताचार्य वासुदेव नारायण तथा वा. ना. उत्पात यांचे कोरोना संसर्गामुळे पुण्यात उपचारादरम्यान आज निधन झाले. ते 80 वर्षांचे होते.


वा. ना. उत्पात हे हिंदुत्वावादी होते. वा. ना. या टोपण नावाने ते राज्यात ओळखले जात होते. अतिशय प्रखरपणे विचार मांडण्यासाठी ते प्रसिद्ध होते. वा. ना. यांच्या जाण्याने चालता- बोलता ज्ञानकोश गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. वा. ना. उत्पात यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास केला तसेच सावरकर साहित्याचा प्रसारही केला. त्यांनी स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. वा. ना. उत्पात हे पंढरपूरच्या समाजकारण, राजकारण व अध्यात्म क्षेत्रातील प्रमुख नाव होते. त्यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भूषविले होते. ते येथील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते. आयुष्यभर वा. ना. उत्पात यांनी अध्यापनाचे कार्य केले. ते कवठेकर प्रशालेचे निवृत्त मुख्याध्यापक होते.


उत्पात हे पंढरपूर अर्बन बँकेचे प्रदीर्घ काळ संचालक होते तसेच त्यांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. त्यांनी पंढरपूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयाची स्थापना केली आहे. भागवत कथा सांगून यातून मिळालेल्या उत्पन्नातून सावरकर क्रांती मंदिराची भव्य वास्तू त्यांनी उभारली. याच वाचनालयात त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेची निर्मिती करून गोरगरीब विद्यार्थ्यांना अभ्यासाची सोय केली होती. वा. ना. हे रुक्मिणी मातेचे पुजारी होते व उत्पात समाजाचे चेअरमन होते. त्यांच्या पश्‍चात चार मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.


कोरोना साथीने पंढरपूरची कधीही भरून न निघणारी हानी केली आहे. पंढरपुरातील अनेक मान्यवर व्यक्तींना कोरोनाविरुद्ध लढाईत प्राणास मुकावे लागले आहे. यात माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, राष्ट्रवादीचे नेते राजूबापू पाटील, ह. भ. प. रामदास महाराज जाधव (कैकाडी), भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर आणि आता वा. ना. उत्पात यांचेही कोरोनाने निधन झाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या पंढरपुरात येणार असून दिवंगत सुधाकरपंत परिचारक, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राजूबापू पाटील आणि रामदास महाराज जाधव उर्फ कैकाडी महाराज यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya