देश वासीयांनो शांतपणे उत्तर शोधा,भारताचा पाकिस्तान होतोय का ?

राजेंद्र शेलार, सातारा
वाचा आणि विचार करा..


स्थैर्य, सातारा, दि.११: यामध्ये कोणताही हिंदू- मुस्लिम असा विषय नाही. विषय आहे राज्यकारभार करण्याचा, धोरणे आखण्याचा आणि सत्ता राबवण्याचा. १९४७ नंतर आपल्या देशाने किती प्रगती केली आणि त्या तुलनेत पाकिस्तान कुठे आहे हे सर्व जग जाणते. याला कारण, त्या देशाने फक्त भारत द्वेष आणि काश्मीर मधिल दहशतवाद या दोनच विषयांवर आपली सर्व शक्ती खर्च केली. एकच ध्येय ठेवले, कसेही करून भारताला प्रगती पासून रोखायचे. म्हणून १९४७ व १९६५ अशी दोन युध्दे त्यांनी भारतावर लादली आणि हरली सुध्दा. १९७२ साली अपरिहार्य कारणांमुळे इंदिराजींना युध्द पुकारावे लागले आणि त्या देशाचे दोन तुकडे झालेले जगाने पाहिले. विषय जय पराजयाचा नाही. विषय आहे तेथील सत्ताधाऱ्यांच्या मनोवृत्तीचा. त्यांच्या देशाच्या प्रगती ऐवजी भारत कसा अडचणीत येईल हेच त्यांनी पाहिले. जनतेला जिहादचे स्वप्न दाखवले, काश्मीर आपलाच आहे आणि कधीतरी आपण तो घेऊ असे स्वप्न दाखवण्यात पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांनी धन्यता मानली. धर्मांध जनता अशा सत्ताधाऱ्यांना मदत आणि बळ देतच असते. मग त्यांना आपण कोणत्या मार्गाने जातोय आणि त्याचे काय परिणाम भोगावे लागतील याचे काहीही भान रहात नाही. फक्त द्वेष आणि द्वेष एवढेच त्यांच्या डोक्यात भिनलेले असते.

मात्र आपल्या त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचे हे ठरवून प्रगतीवर लक्ष केंद्रित केले. काश्मीर तर आपला होताच त्यामुळे काश्मीर आणि पाकिस्तान हे मुद्दे भारताने कायम दुय्यम ठेवले. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा टाचणीही बनवू न शकणार्‍या या देशामध्ये हरित क्रांती, श्वेत क्रांती, दुग्ध क्रांती, औद्योगिक क्रांती, सायन्स क्रांती घडवून आणली. आपले उपग्रह अवकाशात पोहचले, अणू चाचणी घेतली, देश ऊर्जा क्षेत्रात अग्रेसर झाला. भारत सर्व बाबतीत स्वयंपूर्ण झाला. त्याचवेळी पाकिस्तान कायम अमेरिकेसारख्या देशांच्या भिकेवर जगत राहिला. पाकिस्तानच्या प्रत्येक पंतप्रधानांनी आणि अध्यक्षांनी (लष्कर प्रमुख) लोकांचे लक्ष देशाच्या विकासाकडे जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. त्या जनतेलाही विकासापेक्षा भारत द्वेष महत्वाचा वाटला.
त्याचवेळी आपल्या देशातील जनतेने आणि सत्ताधाऱ्यांनी सतत दक्ष राहून, जाणीवपूर्वक पाकिस्तानकडे दुर्लक्ष करून आपल्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केले. संधी मिळताच आपण संस्थाने खालसा केली, बँकांचे राष्ट्रीयकरण करुन गरीबांना व शेतकऱ्यांना कर्जे सहजासहजी मिळतील याची व्यवस्था केली, कसेल त्याची जमीन हा कायदा करुन शेतकऱ्यांना जमीनदारांच्या जोखडातून सोडवले, गावोगावी शाळा काढून शैक्षणिक गुलामगिरी संपवली. खर्‍या अर्थाने रयतचे - जनतेचे राज्य निर्माण केले. राजीव गांधींनी भारतात काँप्युटर युग आणले, त्यामुळे देशामध्ये अनेक उद्योग निर्माण झाले. व्यवसायाच्या विविध संधी नव्याने उपलब्ध झाल्या. कोणत्याही संकटाला तोंड देण्याची क्षमता भारताकडे निर्माण झाली.

पण आजचे सत्ताधारी म्हणतात ७० वर्षांमध्ये काँग्रेसने काय केलं ?
अरे धर्मांध होऊन डोळ्यांवर व्यक्तिव्देषाची झापडं लावली की त्याला काहीच दिसत नाही. पाकिस्तान ७० वर्षांनंतर नेमका कसा आहे पहा. एक भूखा, नंगा देश, जो अमेरिका किंवा चीनने टाकलेल्या तुकड्याच्या मदतीवर जगणारा परावलंबी पाकिस्तान हीच त्याची ओळख ना ?

मात्र, आपला देश आज ताठ मानेने जगात उभा आहे. विकसनशील राष्ट्रांचे नेतृत्व करणारा, जगातील तिसर्‍या शक्तींचा मार्गदर्शक आणि जागतिक शांततेचा पुरस्कर्ता देश हा सन्मान मिळवलेला शक्तिशाली भारत. हा भारत काय फक्त मागच्या पाच वर्षांतील मोदींच्या कामामुळे घडला आहे का ? मागच्या ७० वर्षात तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी आणि जनतेनी केलेल्या कष्टाची ही कमाई आहे. त्या काळात काही चुकिची कामे झाली असतील, काही ठिकाणी भ्रष्ट कारभारही झाला असेल. पण तो त्या राज्यकर्त्याचा वैयक्तिक दोष आहे. त्याला काँग्रेस पक्षाची धोरणे खराब होती असे कसे म्हणता येईल ? तरीही काँग्रेसला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागलेच. लोकांनी काँग्रेसचा पराभव केला. या पराभवाचे मला दुःख वाटत नाही. परंतू ७० वर्षात काँग्रेसने काहीच केले नाही असे म्हणणारांची मात्र किव करावी वाटते. बेट्यांनो मागे वळून पहा हा देश कसा होता ते. मुळात भारत हा एकसंघ देशच नव्हता कधी. शेकडो राजे आणि महाराजे यांच्या छोट्या छोट्या जहागिरीत विखुरलेला हा प्रदेश काँग्रेसने एक केला आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून नावारूपाला आणला. ७० च्या दशकापर्यंतची या देशाची गरीबी तुम्हाला माहित नाही. आज दिसणारी नवश्रीमंतांची बहूगर्दी आणि उच्यशिक्षीतांची मांदियाळी ही काँग्रेसच्या विचारांची देणगी आहे. आज हेच सारे लोक काँग्रेसने काय केले हा प्रश्न विचारतात. 

हे सारे ऐकून, पाहून मनात असा प्रश्न निर्माण होतो की, आपला देश पाकिस्तानच्याच रस्त्याने चालला आहे का ? सध्या देशामध्ये पूर्वी कधीच नव्हते एवढे देशप्रेम उतू जात आहे. मग याआधी आपण देशप्रेमी नव्हतो का ? पाकिस्तानचा द्वेष आणि त्यांना रोज शिव्या घालने हीच देशप्रेमाची व्याख्या आहे का ? मागच्या पाच वर्षात आपल्याला नवीन देशभक्ती शिकवली जातेय हे मात्र खरे आहे. मोदींसाहेब, अमित शहा, राजनाथसिंग आणि भाजपाचे इतर वाचाळ विर पाकिस्तानला कसे अडजणीत आणायचे, त्यांना कसे नामोहरम करायचे एवढेच बोलत आहेत. त्यावरच त्यांचा फोकस आहे. जोडीला तीन तलाक विरोधी कायदा, कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय, समान नागरी कायद्याचा आग्रह.. यामुळे संपूर्ण देशात उन्मादी वातावरण तयार करण्यात यश आले आहे. हीच यांची देशप्रेमाची व्याख्या आहे. ७० वर्षात काँग्रेसने जे केले नाही ते आम्ही केले. अशा बढाया सुरु आहेत. हा, यातील काही गोष्टी निश्चित चांगल्या आहेत. विकासाचे धोरण राबवताना काँग्रेसचे याकडे दुर्लक्ष झाले हेही मान्यच आहे. पण महत्वाचे म्हणजे ज्या कारणांसाठी यांना निवडून दिले त्याबद्दल हे कधी बोलतात का ? देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन करायचं म्हणतायत, पण प्रत्यक्षात तसे काही होताना दिसत नाही. मागच्या पाच वर्षात अनेक कंपन्या बंद झाल्या, हजारो नोकऱ्या गेल्या, नवीन नोकऱ्या निर्माण होत नाहीत. अर्थव्यवस्था संकटात आहे, मंदीची लाट आली आहे, शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, शैक्षणिक धोरणाचा बोजवारा उडाला आहे, लघु उद्योग रसातळाला जात आहेत, गरीब - श्रीमंतीची दरी अधिक रुंदावत आहे..

देशाच्या मालकीचे नामांकित उद्योग, प्रचंड नफ्यात असलेल्या पेट्रोलियम कंपन्या, सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची व आर्थिक सक्षम असलेली विमानतळप्राधिकरणे, मोठ्या संशोधन संस्था, आणि BSNL सारखी मोठी दुरसंचार यंत्रणा कवडीमोल किमतीत अंबाणी - अदाणी यांच्या खाजगी उद्योगाला विकण्याचा सपाटा मोदी सरकारने लावला आहे. भविष्यात याचे होणारे दुष्परिणाम जनतेला भोगावे लागतील. या सर्व घातक निर्णयांकडे लक्ष जाऊ नये व लोक सतत विचलित रहावेत म्हणून मिडीयावरुन सुशांत रजपूत, रिया चक्रवर्ती, कंगणा रणावत या विषयांचा भडीमार सुरु आहे. 

असे चुकीचे निर्णय घेत असलेल्या देशाच्या सर्वोच्च सत्तेला आव्हान देण्याचे व लगाम घालण्याचे सामर्थ्य असलेला नेता व संघटना काँग्रेस शिवाय इतर कोणाकडे आहे ?

या सर्व गंभीर प्रश्नांकडे कोण लक्ष देणार ? काँग्रेसचा पराभव करून यासाठीच तुम्हाला सत्ता दिली आहे का ?
मात्र हे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष द्यायचे सोडून पाकिस्तानने ७० वर्षे जे केले तेच आपले सत्ताधारी आज करत आहेत. म्हणजे काय तर, देशप्रेम आणि धर्माची अफू याचा उदोउदो... एकदा ही अफू डोक्यात गेली की विकासाचे प्रश्न कोणीही विचारत नाही, कामाचे मुल्यमापण होत नाही आणि देशाच्या आर्थिक स्थिती बद्दल जास्त विचार करायचा नाही हे ओघाने आलेच. मित्रांनो, मी जे मांडतोय हे सुध्दा, 'मोदी है तो मुमकीन है' असे म्हणणाऱ्यां भक्तांना पचणारे नाही. पण हेच सत्य आहे. आपला भारत देश धर्मांध पाकिस्तानच्या वाटेवर चाललाय, सावधान.

राजेंद्र शेलार 
8999247187

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya