फलटण शहर व तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी

 

स्थैर्य, फलटण दि. १०: गत सप्ताहात रविवारी रात्री आणि त्यानंतर काल बुधवारी रात्री फलटण शहर व तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून उभ्या खरीप पिकांसह फळबागा, भाजीपाला, चारा पिकांचे मोठे नुकसान झाले असतानाच मोठ्या प्रमाणावर जमिनीची धूप झाल्याने तसेच वादळ वाऱ्यात काहींची राहती घरे, जनावरांचे गोठे वगैरे इमारतींचे नुकसान झाले आहे.
रविवारी झालेल्या पावसाने तालुक्यातील ३८१६ शेतकऱ्यांच्या १२४३.३९ हेक्टर क्षेत्रातील उभ्या बाजरी, मका, भाजीपाला आणि ऊस पिकांचे १ कोटी २ लाखाहुन अधिक नुकसान झाल्याचा नजर अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे, सदर नजर अंदाज हा ३३% पेक्षा अधिक नुकसान झालेले क्षेत्राचा आहे, वास्तविक ३३ % पेक्षा कमी असले तरी ते नुकसानच आहे म्हणजेच प्रत्यक्ष नुकसान अधिक आहे.
त्यानंतर बुधवार दि. ९ रोजी रात्रीही असाच प्रचंड पाऊस जवळपास संपूर्ण तालुक्यात कमी अधिक प्रमाणात झाला असून ग्रामतलाव, पाझर तलाव, बंधारे भरल्याने पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असतानाच वादळ वारे, पावसाने उभ्या खरीप पिकांचे, फळबागा, ऊस क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
अगोदरच्या वादळ वारे व पावसात नुकसान झाले, त्यानंतर आता झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर जमिनीतून पाणी बाहेर पडल्याने जमिनीची धूप झाली आहे, बांध बंधारे वाहुन गेले आहेत, काही ठिकाणी छोटे तलाव, बंधारे फुटल्याने त्या क्षेत्राची मोठी धूप झाली आहे.
बाणगंगा नदीसह अनेक ओढ्या नाल्यांवरील बंधारे पूर्ण भरल्याने पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन ओढे, नदी नाल्यांकाठचे क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.
फलटण-पंढरपूर, फलटण-आसू, फलटण-बारामती वगैरे मुख्य रस्त्यावरील तसेच ग्रामीण भागातील अंतर्गत वाहतूक ओढ्याला आलेल्या पुरामुळे काही काळ बंद झाली होती. पुराच्या पाण्याचा आणि रस्त्याच्या परिस्थितीची नक्की माहिती नसल्याने अनेक वाहन चालक पुराच्या पाण्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात संकटात सापडले होते, स्थानिकांच्या मदतीने ते सुखरुप बचावले आहेत.
फलटण-आसू रस्त्याने आसू परिसरात गॅस सिलेंडर विरणासाठी निघालेला भारत गॅस कंपनीच्या येथील एजन्सीचा ट्रक (एम एच ११ AL ०६३२) गोखळी पाटी येथे ओढ्याच्या पाण्यात खचलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने पलटी झाला ट्रकमध्ये 306 गॅस टाक्या होत्या, मात्र त्या जाळीमध्ये लाॅक असल्याने पुराच्या पाण्यात टाक्या वाहुन जाण्याने होणारे नुकसान टळले आहे. ट्रक चालक संकपाळ यांना कसलीही दुखापत झाली नसून ग्रामस्थ तरुणांनी त्यांना सुरक्षीत बाहेर काढले आहे. ट्रक मधील कागदपत्रे भिजली आहेत.
फलटण तालुक्यातील अनेक मुख्य रस्त्यांचे भविष्यात राष्ट्रीय महामार्गात रुपांतर होणार असून सध्या भूसंपादन प्रक्रिया सुरु आहे. मुख्य रस्ते महामार्गात रुपांतरित झाल्यानंतर त्यावरील सध्याचे छोटे पूल आपोआप मोठे होतील त्यावेळी ओढ्याला पूर आल्याने वाहतूक खंडीत होण्याचा प्रसंग येणार नाही, तथापी फलटण-आसू रस्त्यावरील गोखळी पाटी, मांगोबा माळ, विडणी, साठे फाटा येथील उंची वाढवून सदर रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याची आवश्यकता आहे.
आपद कालीन परिस्थितीत ग्रामीण भागात स्थानिक ग्रामविकास समित्या, पोलीस पाटील, तरुणवर्ग ग्रामस्थांना मोठी मदत करीत असल्याचे दिसून येते.
आज गुरुवार दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी संपलेल्या २४ तासात फलटण शहर व तालुक्यात झालेला महसूल मंडल निहाय पाऊस कंसात एकूण पाऊस मि. मी. मध्ये खालीलप्रमाणे - फलटण ५७ (४५१), आसू २३ (३९९), होळ २६ (३६२), गिरवी ३० (२९७), आदर्की ३८(१९८), वाठार निंबाळकर ४८ (४४८), बरड ५९ (३४६), राजाळे ५८ (२६०), तरडगाव २९ (७१६).
तालुक्यात आतापर्यंत ३८६.३३ मि. मी. सरासरी ४०.८९ मि. मी. पाऊस झाला आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya