पुण्यात ऑक्सिजन, रुग्णवाहिकांचा तुटवडा; पालकमंत्र्यांची कबुली

 

स्थैर्य, पुणे, दि.६: पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय हे वास्तव आहे. त्याचा आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण येत असल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात येत आहे. पुण्यात ऑक्सिजन सिलेंडर आणि रुग्णवाहिकांचा तुटवडा जाणवत आहे. तसेच पुण्याबाबत आमच्याकडून काही चुका झाल्याची कबुली खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवनात कोरोना विषाणू आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, महापौर मुरलीधर मोहोळ,यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पवार म्हणाले, गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली.त्याचे ओझे नव्याने सुरू करण्यात आलेल्या जम्बो हॉस्पिटलवर पडले. त्यामुळे तिथली व्यवस्थेत पुरता गोंधळ उडाला.शहरात अपेक्षित असताना ऑक्सिजनच्या सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय ही परिस्थिती वास्तव आहे. तसेच गंभीर रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याच्या देखील तक्रारी समोर येत आहे.

रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी प्रशासन यंत्रणांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. त्याचप्रमाणे अनेक लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वांनी नियमांचे पालन करून काळजी घेणे गरजेचे आहे.
Previous Post Next Post