आरटीओच्यावतीने शनिवारी, रविवारी देखील शिकाऊ व पक्क्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठीची चाचणी सुरु

 


स्थैर्य, सातारा, दि. १० : महाराष्ट्रातील सर्व आरटीओ कार्यालयात ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीसाठी नागरिकांना विलंब होऊ नये म्हणून आरटीओच्यावतीने शनिवारी, रविवारी देखील शिकाऊ व पक्क्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठीची चाचणी सुरु केली आहे. याबाबतचे आदेश राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी पत्राव्दारे काढले आहेत.


शिकाऊ व पक्क्या लायसन्ससाठी अपॉइंटमेंट 2 ते 3 दिवसांत मिळेल. यासाठी परिवहन विभागाने कार्यवाही करावी. शिकाऊ आणि पक्क्या लायसन्ससाठीचा कोटा कोविड पूर्व कोट्याप्रमाणे करावा. प्रत्येक शनिवार व रविवार शिकाऊ आणि पक्क्या लायसन्ससाठी चाचणी करावी, असे आदेश राज्यातील सर्व प्रादेशिक/ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनचे विजयकुमार दुग्गल, ज्ञानेश्‍वर वाघुले, धर्मेश सचदे व शिष्टमंडळाने परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन ड्रायव्हिंग चाचणीसाठी होणार्‍या दिरंगाईवर उपाययोजना करण्याची मागणी केली होती. यावर ढाकणे यांनी त्वरित निर्णय घेऊन उपाययोजनेचे आदेश दिले.

 

विजयकुमार दुग्गल म्हणाले, ढाकणे यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारून केवळ 15 दिवस झाले आहेत. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिले. आणि त्यांनी तातडीने सूत्रे हलवित नागरिकांच्या सुविधेसाठी शनिवारी व रविवारी या सुट्टीच्या दिवशी देखील आरटीओमध्ये ड्रायव्हिंग चाचणी सुरू केली आहे. यामुळे नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya