कोरेगावच्या उत्तर भागात पावसाने उसाचे फड भुईसपाट


 

स्थैर्य, कोरेगाव, दि. १० : गेल्या चार दिवसांपासून परतीच्या मान्सूनने जोरदार हजेरी लावल्याने कोरेगावच्या उत्तर भागात ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वार्‍यासह आलेल्या पावसाने उसाचे फड भुईसपाट झाले आहेत.


गेल्या चार दिवसांपासून वातावरणात कमालीची उष्णता वाढली आहे. दुपारी 1-2 वाजल्यानंतर आकाशात ढगांचे काहूर माजत असून वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात होत आहे. दोन दिवस झालेल्या जोरदार वादळी वार्‍यासह पडलेल्या पावसाने उभ्या उसाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती शेतकर्‍यांनी दिली. पिंपोड्यासह दहिगाव, वाघोली, सोनके, नांदवळ, नायगाव, करंजखोप, अनपटवाडी व राऊतवाडीत जोरदार वार्‍याचा मोठा फटका बसला. सातत्याने जोरदार वारे वाहू लागल्याने उंच वाढलेला ऊस आडवा झाल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. वार्‍याबरोबरच पाऊस असल्याने ऊस पाण्यातच पडल्याचे चित्र आहे. सातत्याने पाऊस सुरू राहिल्याने पडलेला ऊस कुजण्याची भीती ऊस उत्पादकांनी व्यक्त केली. गेल्या वर्षीपासून पाऊसमान चांगले असल्याने या परिसरात उसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून वसना नदीच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. शिवारे जलमय होत आहेत. कोरोनाच्या तडाख्याने रडकुंडीला आलेल्या शेतकर्‍यांचे पावसाने कंबरडे मोडले आहे. घेवडा भिजल्याने दरात घसरण होण्याची भीती आहे. त्यामुळे मोठे नुकसान शेतकर्‍यांना सोसावे लागणार आहे. अनेक शेतकर्‍यांच्या आशा ऊस पिकावर होत्या. मात्र आता हे पीक भुईसपाट झाल्याने अडचणी वाढल्या आहेत.अगोदर कोरोनामुळे भाजीपाला विकता आला नाही. आता पावसाने ऊस हे हक्काचे पीक भुईसपाट झाले आहे. त्यामुळे घूस, उंदीर यांचा प्रादुर्भाव वाढेल. त्यामुळे सरकारने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.


सध्या शेतकर्‍यांना कोरोनाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. बाजार बंद असल्याने तरकारी पिके फेकून द्यावी लागली. त्यातच आता अस्मानी संकट आल्याने आमचे दुहेरी नुकसान झाले आहे.- किरण धुमाळ, ऊस उत्पादक शेतकरी, नायगाव.


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya