राऊत - कंगना वाद : देशाच्या लेकी तुम्हाला माफ करणार नाहीत संजयजी; मी तुमची निंदा करते, भेटू 9 सप्टेंबरला - कंगना रनोट

 

स्थैर्य, सातारा, दि.६: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील वाद कमी होताना दिसत नाहीये. अभिनेत्री कंगना रनोटने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली आणि हा वाद सुरू झाला. यानंतर राऊत कंगनाविरोधात पेटून उठले. आता कंगनाही त्यांना सडेतोडपणे उत्तर देत आहे. कंगनाने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊतांना सुनावले आहे.

कंगना रानावतने यावेळी संजय राऊतांवर विखारी शब्दांमध्ये टीका केली आहे. कंगना म्हणते की, 'संजय जी तुम्ही मला हरामखोर मुली म्हणालात... तुम्ही एक मंत्री आहात आणि हे तुम्हाला माहितच असेल की या देशात तासाला अनेक महिलांवर बलात्कार होताय, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत अॅसिड हल्ला केला जातोय. तुम्हाला माहित्येय याला जबाबदार कोण आहे? तुम्ही माझ्याप्रती अपशब्द वापरून जी मानसिकता दाखवली, हीच त्याला जबाबदार आहे. या देशातील लेकी तुम्हाला कधीच माफ करणार नाही,' असं कंगनाने व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे.

संजय राऊत तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही

कंगना पुढे बोलताना म्हणाली की, मी तुमच्यावर टीका केली. पण, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. मी 9 सप्टेंबरला मुंबईत येतेय.. तुमचे लोक जबडा फोडू, मारुन टाकू अशा धमक्या देत आहेत. मी सांगते तुम्ही माराच... या देशातील मातीचं कर्ज रक्त सांडूनच निभावता येईल. 9 सप्टेंबरला भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र असं आव्हानचं कंगनाने राऊतांना दिलं आहे.

आमिर खान, नसरुद्दीन शाह यांना कोणी काही म्हणालं नाही

तसेच पुढे ती म्हणाली की, आमिर खान म्हणाले होते की, मला या देशात असुरक्षित वाटतं तेव्हा तुम्ही त्यांना काही बोलले नाही. त्यावेळी कुणीच असे अपशब्द वापरले नाहीत. नसरुद्दीन शाह यांनाही कुणीच प्रत्युत्तर दिलं नाही. अन् मी नेहमीच मुंबई पोलिसांच कौतुक करत कधीच थकत नाही. पण यावेळी सुशांत प्रकरणावरुन बोलले आणि हे माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.

काय म्हणाले होते राऊत ?

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना रणौतवर 'हरामखोर मुलगी' म्हणत टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर अनेकांकडून आक्षेप नोंदवण्यात आला. राऊतांनी कंगनाची माफी मागावी अशी अनेकांकडून मागणी होत आहे.

काय म्हणाली होती कंगना ?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिली असून मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका कंगनाने ट्विटरवरुन केली होती. तिने ट्विट करत लिहिले होते की, ' आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?'
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya