कोरोनावर मात करून श्रीमंत संजीवराजे पुन्हा फिल्डवर; कोळकी पोलीस औट पोस्टच्या नियोजित जागेची केली पाहणी


स्थैर्य, फलटण : कोळकी, ता. फलटण येथील पोलीस दुरक्षेत्रासाठी ग्रामपंचायत मालकीची, आरोग्य उपकेंद्रालगतची, फलटण-दहिवडी मार्गावरील 3 गुंठे जागा  श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्वतः जागेवर येऊन निश्‍चित केल्याची माहिती पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे यांनी दिली आहे. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोना या आजाराची लागण झालेली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी कोरोनावर मात करून पुन्हा फिल्डवर येऊन कार्यरत झालेले आहेत.


कोळकी पोलीस दुरक्षेत्रासाठी 400 चौ. मी. क्षेत्रफळाची इमारत उभारण्यात येणार असून त्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर झाले आहेत, सदर इमारतीसाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत वरील जागा निश्‍चित करण्यात आली त्यावेळी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, पुंडलिक नाळे, वैभव नाळे, पै. संजय देशमुख, कैलास शिंदे, जनार्दन मोरे, अबीद शेख, ग्रामपंचायत प्रशासक एल. एच. निंबाळकर उपस्थित होते. 


फलटण ग्रामीण पोलीस ठाणे कार्यालय, शहर पोलीस ठाणे लगत बहु उद्देशीय सभागृह, अधिकारी, कर्मचारी निवासस्थाने, शिरवळ व सुरवडी पोलीस ठाणे आणि कोळकी व हनुमंतवाडी येथे पोलीस दुरक्षेत्र इमारती उभारणे कामी 17 कोटी 35 लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली असून त्यानुसार कोळकी पोलीस दूरक्षेत्र इमारत उभारणे कामास गती देण्यात येत आहे.


कोळकी प्रमाणेच हनुमंतवाडी येथील पोलीस दूरक्षेत्र इमारतीचे कामही लवकरच सुरु करण्यात येणार असून सदर जागेची पाहणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरिक्षक नितीन सावंत यांनी नुकतीच प्रत्यक्ष जागेवर जावून केली आहे. सदर कामासही लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.


कोळकी पोलीस दूरक्षेत्र इमारत फलटण-दहिवडी व फलटण-शिंगणापूर या मुख्य रस्त्यावर उभारण्यात आल्याने या दोन्ही रस्त्यावरील वाढती वाहतूक त्याचप्रमाणे वाढत्या कोळकी शहराच्या विस्ताराला कायदा, सुव्यवस्था सांभाळणे व सुरक्षिततेच्या दृष्टीने मुख्य रस्त्यावरील जागा योग्य ठरेल असा अभिप्राय व्यक्त करीत श्रीमंत संजीवराजे यांनी आरोग्य उपकेंद्रालगतची जागा निश्‍चित केली आहे.


दरम्यान कोळकी व परिसराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत असताना वीज वितरण कंपनीच्या वीज उपकेंद्रातून जाणार्‍या उच्चदाब वीज वाहिन्या अनेक ठिकाणी रहिवासी भूखंडावरुन काही ठिकाणी उभ्या इमारतीवरुन जात असल्याने येथील रहिवाशांसाठी धोकादायक स्थिती निर्माण झाल्याने वीज वितरण कंपनीने सदरच्या धोकादायक वीज वाहिन्यांमधील वीज पुरवठा बंद करुन अन्यत्र वीज वाहिन्या उभारल्या मात्र गेली 7 वर्षे या बंद स्थितीतील वीज वाहिन्या व त्यांचे खांब आहे त्या स्थितीत उभे असल्याने घरांचा विस्तार किंवा नवीन घरे उभारताना अडचणी येत असल्याचे यावेळी श्रीमंत संजीवराजे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचे सचिन रणवरे यांनी सांगितले.

Previous Post Next Post