सुंदर सातार्‍यासाठी तरुणाईकडून सप्तरंगांची उधळण

 


स्थैर्य, सातारा, दि. 20 : अलीकडच्या काळात कास पठारावरील फुलांमुळे सातार्‍याची ओळख जगभर पसरली आहे. त्याबरोबर ठोसेघर, सज्जनगड, प्राचीन मंदिरे यामुळे पर्यटकांना सातार्‍याची भुरळ पडत आहे. मुळातच निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आपल्या सातार्‍याला आणखी सुंदर करण्याचा विडा येथील ‘मेकिंग सातारा’ या एका ग्रुपने उचलला असून त्या अंतर्गत शहरातील घरे, अपार्टमेंट, बंगले यांच्या भिंतींवर सप्तरंगांची उधळण करत  त्यांनी शहराच्या सौंदर्यात भर घालण्याच्या उपक्रमाला रविवारी प्रारंभ केला.


आपल्या शहराला सुंदर करण्याच्या या संकल्पनेची कल्पना या ग्रुपची संस्थापक असलेल्या मेधा शिरकांडे या तरुणीची. तिला सक्रिय साथ आहे ती शुभम भोसले, गायत्री शिंदे हिच्यासह सुमारे 20 जणांची. ‘मेकिंग सातारा’ या ग्रुपने सातारा आणखी सुंदर करण्याच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला रविवारी सदरबझार परिसरातील सुमित्राराजे उद्यानानजीकच्या विक्रांत गार्डन अपार्टमेंटची वॉल कंपाऊंडची भिंत अत्यंत सुंदर अशा पद्धतीची चित्रं काढून सुरुवात केली. सकाळी 9 वाजता या ग्रुपचे सर्व सदस्य या ठिकाणी जमले. फिजिकल डिस्टन्सिंग पाळून त्यांनी ही भिंत रंगवण्यास प्रारंभ केला.  केवळ दोन तासात ही आधी केवळ पांढरी असणारी भिंत चिमण्यांची चित्रं काढून सुंदर करण्यात आली.


‘मेकिंग सातारा’ हा ग्रुप केवळ ही एकच भिंत रंगवून थांबणार नाही तर सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या भिंतींवर अशी चित्र मोफत काढणार आहे. ज्या चित्रांच्या माध्यमातून आपला सातारा खर्‍या अर्थाने सुंदर होणार आहे.

शहरासह उपनगरातील ज्या कुणाला अशी वॉल पेंटिंग आपल्या घरांवर, बंगल्यांवर, अपार्टमेंटवर काढून हवी असतील त्यांनी ‘मेकिंग सातारा’ या ग्रुपच्या  9665545519 आणि 8095982927 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन या ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे.