शाहूपुरी आघाडीच्या ग्रा.पं.सदस्यांनी केली मासिक भत्ता रकमेतून ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशिन खरेदी

 


स्थैर्य, सातारा, दि. २१ : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर भयभीत झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी परिसरातील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बेड उपलब्ध करून देणे, त्यांना लागेल ते सहकार्य करणे ही जबाबदारी शाहूपुरी ग्रामविकास आघाडीकृत. 'ॲंटी कोरोना समन्वय कृती समिती शाहूपुरीची ' निर्मिती करुन या समितीमार्फत पार पाडली जात आहे. सद्यस्थितीतही संपूर्ण सातारा जिल्ह्यासह सातारा शहर व तालुक्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमुळे संबंधित रुग्णांना कोणत्याही दवाखान्यात सहजपणेजागाही उपलब्ध होत नाही हे वास्तव आहे. परिणामी ज्या रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल कमी आहे अशांना ऑक्सिजनची उपलब्धता न झाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. 

अशा परिस्थितीत अनेक समाजोपयोगी उपक्रमांत अग्रेसर असलेल्या शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे वतीने ज्या होम आयसोलेटेड रुग्णांना ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशिनची गरज आहे अशांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्रकुमार मोहिते, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, शोभाताई राजेंद्र केंडे, निलमताई विकास देशमुख, माधवीताई सुरेश शेटे या आपल्या ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या सदस्य पदाच्या कारकिर्दीतील आपापल्या वाट्याचा सर्व मासिक भत्ता या मशिन खरेदीसाठी देऊ केल्याने  ही सेवा रुग्णांसाठी यास्थितीत देणे शक्य झाले असल्याची माहिती भारत भोसले यांनी दिली. आघाडीने आजवर राजकारणाबरोबरच समाजकारणाची भूमिका आपल्या विविध सामाजिक उपक्रमांतून जपली आहे तोच वारसा जपत याहीवेळी आघाडीच्या ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या स्वनिधीतून हे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशिन सामाजिक बांधिलकी म्हणून उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देत  त्यांची ही कृती आघाडीसाठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन केले. तसेच,या सामाजिक उपक्रमासाठी ज्यांना शक्य आहे अशांनी सहभागी व्हावे असेही आवाहन  आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. बाळासाहेब निकम यांनी आभार मानले.Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya