ग्रामीण भागात प्रतिसाद पाहून एसटीच्या फेऱ्या सुरू करा; फलटण पंचायत समितीच्या मासिक सभेत ठराव

 

स्थैर्य, फलटण, दि.११: सध्या फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोना या आजाराने आपले हात चांगलेच पसरलेले आहेत. आत्ता नुकतीच एसटी महामंडळाच्या वतीने एसटी बसेमध्ये सुरक्षित अंतर ठेवून बसेस चालू करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये बसमध्ये नागरिक बसल्यानंतर त्यांना सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत. व बसची फेरी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण बस सॅनिटाइज करावी. फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये प्रतिसाद पाहूनच एसटी बसेस पूर्वीप्रमाणे सुरू कराव्यात, असे आदेश पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर निंबाळकर यांनी फलटण पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये दिले.

फलटण पंचायत समितीची मासिक सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काल दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजी पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ. अमिता गावडे, पंचायत समिती सदस्य सौ. रेश्मा भोसले, सचिन रणवरे, संजय कापसे, सौ. जयश्री आगवणे यांच्यासह सह इतर अधिकारी उपस्थित होते.

विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपला फलटण येथील मुधोजी मनमोहन राजवाडा कोरोना केअर सेंटर साठी शासनास उपलब्ध करून दिल्याबद्दल व कोळकी ता. फलटण येथे पोलीस औट पोस्ट साठी भरीव असा 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सर्वांच्या वतीने अभिनंदनाचा ठराव पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे यांनी मांडला व सदरील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिपकराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे झिरपवाडी ता. फलटण येथील बंद अवस्थेत असलेले जुने ग्रामीण रुग्णालय येथे खास संसर्गजन्य आजारासाठी भागीदारी तत्त्वावर विशेष रुग्णालय स्थापन करण्याची मान्यता आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी दिल्याबद्दल सर्वांचेच अभिनंदन करण्याबाबतचा ठराव पंचायत समिती सदस्य संजय कापसे यांनी मांडला व सदर ठराव हा बहुमताने मंजूर करण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत फलटण तालुक्यातील विविध विकास कामांसाठी 17 कोटी 35 लाख रुपये मंजूर केल्याबद्दल विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे फलटण तालुक्याच्या वतीने पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान सदस्य सौ. रेश्मा भोसले यांनी आभार मानले.

गत काही दिवसांपासून फलटण तालुक्यामध्ये अति वृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी करून त्यांचे त्वरित पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी असे आदेश उपसभापती सौ. रेखा खरात यांनी दिले.

फलटण तालुक्यामधील नागरिकांना आलेल्या अव्वाच्यासव्वा लाईट बिलाबाबत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने तात्काळ कार्यवाही करून नागरिकांचे, शेतकऱ्यांचे व शेती पंपाचे लाईट बिल कमी करून नूतन लाईट बिल सर्वांना देण्यात यावेत याबाबत तातडीने निर्णय घ्यावा असे आदेश सभापती शिवरूपराजे खर्डेकर निंबाळकर यांनी दिले.

सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोना म्हणजेच कोव्हिड 19 या आजाराची काय परिस्थिती आहे. याची सविस्तर माहिती व फलटण तालुक्यामध्ये डेंग्यू या आजारासहीत इतर साथीचे आजारही फैलाव करीत आहेत. याबाबत आरोग्य विभागामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे यांनी सभागृहाला दिली.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya