सुशांतचा व्हिसेरा अहवाल : एम्सने सीबीआयकडे सोपवला अहवाल, सूत्रांचा दावा - व्हिसेरामध्ये विष सापडले नाही, परंतु कूपर रुग्णालयाला क्लीन चीट नाही

 

स्थैर्य, दि.२९: एम्स डॉक्टरांच्या समितीने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा व्हिसेरा अहवाल सीबीआयकडे सोपवला आहे. मीडिया रिपोर्टनुसार एम्सच्या डॉक्टरांना व्हिसेरामध्ये कोणत्याही प्रकारचे विष आढळलेले नाही. सुशांतच्या शवविच्छेदन अहवालाची चौकशी करण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वात एम्सच्या पाच डॉक्टरांची समिती तयार केली गेली. 20 सप्टेंबर रोजी हे पथक आपला अहवाल सादर करणार होते. मात्र याला 8 दिवसांचा उशीर झाला. आता डॉक्टरांच्या टीमचा अभ्यास पूर्ण झाला असून त्यांनी सीबीआयकडे आपला अहवाल सोपवला आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, सुशांतच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करणार्‍या मुंबईतील कुपर रुग्णालयाच्या डॉक्टरांना या अहवालात क्लीन चीट देण्यात आलेली नाही. सुशांतचे शवविच्छेदन कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी केले होते. परंतु त्यांनी दिलेल्या रिपोर्टवर प्रश्न उपस्थित झाले होते. सुशांतच्या गळ्यावर मिळालेल्या जखमांचा अहवालात उल्लेख नव्हता. शिवाय त्याच्या मृत्यूची वेळ देखील त्यात नमूद करण्यात आलेली नव्हती. यानंतर सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसेच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, एम्स डॉक्टरांच्या समितीने अभ्यासात समोर आलेले तथ्य आणि माहिती सीबीआयकडे सोपवली आहेत. सोमवारी यासंबंधी सविस्तर बैठक पार पडली. एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि गेल्या 40 दिवसांत सीबीआय तपासात आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत. सूत्रांनुसार, एम्सच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती तज्ञांचे मत म्हणून ग्राह्य धरले जाणार असून त्यांना साक्षीदार म्हणूनही उभे केले जाऊ शकते.

केवळ 20 टक्के व्हिसेराच्या आधारे अहवाल दिला

एम्सने सुशांतच्या 20% व्हिसेराच्या तपासणीचा अहवाल तयार केला आहे, कारण मुंबई पोलिसांनी त्यांच्या तपासणीत 80% व्हिसेराचा वापर केला होता. 14 जून रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या वांद्रे फ्लॅटमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.

मुंबई पोलिसांच्या चौकशीत फाउल प्ले मिळाला नव्हता

सुमारे तीन महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांनीही व्हिसेरा अहवाल प्रसिद्ध केला होता. सुशांतच्या पोस्टमार्टमनंतर व्हिसेरा तपासणीसाठी कलिना फोरेंसिक लॅबला देण्यात आला. प्रयोगशाळेने आपल्या अहवालात मृत अभिनेत्याच्या शरीरात कोणतेही संशयित रासायनिक किंवा विष सापडले नसल्याचे स्पष्ट केले होते.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya