पंतप्रधानांनी जयपूरमध्ये पत्रिका गेटचे केले उद्घाटन

 

स्थैर्य, सातारा, दि.८: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जयपूर येथे पत्रिका गेटचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी पत्रिका समूहाचे अध्यक्ष गुलाब कोठारी यांनी लिहिलेल्या संवाद उपनिषद आणि अक्षयात्रा पुस्तकांचे प्रकाशन देखील केले.

हे गेट राजस्थानची संस्कृती प्रतिबिंबित करून देशातील व आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनेल असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

या दोन पुस्तकांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की ते भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाचे खरे प्रतिनिधी आहेत आणि समाज शिक्षित करण्यात लेखकांची भूमिका मोठी आहे.

प्रत्येक मोठा स्वातंत्र्य सैनिक काही न काही लिखाण करायचे आणि आपल्या लिखाणातून लोकांना मार्गदर्शन करायचे याचे स्मरण यावेळी पंतप्रधानांनी केले.

भारतीय संस्कृती, भारतीय सभ्यता, मूल्ये टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नांसाठी त्यांनी पत्रिका समूहाचे कौतुक केले.

पंतप्रधानांनी पत्रिका समूहाचे संस्थापक, कर्पूर चंद्र कुलीश यांच्या पत्रकारितेतील योगदानाचे आणि नंतर त्यांनी ज्याप्रकारे वेदांचे ज्ञान समाजात पसरविण्यासाठी जे प्रयत्न केले त्याचे कौतुक केले.

कुलिश यांचे जीवन व काळ यांचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की प्रत्येक पत्रकाराने सकारात्मकतेने कार्य केले पाहिजे. ते म्हणाले की खरेतर प्रत्येक व्यक्तीने सकारात्मकतेने कार्य केले पाहिजे जेणेकरून ती व्यक्ती समाजासाठी काही अर्थपूर्ण कार्य करू शकेल.

दोन पुस्तकांचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की वेदांमध्ये व्यक्त केलेली मते चिरंतन आहेत आणि ती संपूर्ण मानवजातीसाठी आहेत. उपनिषद संवाद आणि अक्षर यात्रा मोठ्या प्रमाणात वाचली जावीत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

आपल्या नवीन पिढीने महत्वपूर्ण ज्ञानापासून दूर जाऊ नये यावर पंतप्रधानांनी भर दिला. वेद आणि उपनिषद केवळ आध्यात्मिक ज्ञानाचेच नव्हे तर वैज्ञानिक ज्ञानाचे मूर्तिमंत रूप आहेत असे ते म्हणाले.

गरिबांना शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी तसेच अनेक आजारांपासून त्याचे संरक्षण करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाची आवश्यकता असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. त्यांनी यावेळी, माता-भगिनींना धुरापासून वाचविण्याचे उद्दीष्ट समोर ठेऊन सुरु केलेल्या उज्वला योजनेचे महत्व आणि प्रत्येक घरात पाणीपुरवठा करण्यासाठी राबविण्यात आलेल्या जल जीवन अभियान याविषयी सांगितले.

कोरोनाबद्दल जनजागृती करण्यासाठी भारतीय प्रसारमाध्यमांनी दिलेले योगदान आणि त्यांनी जनतेच्या केलेल्या अभूतपूर्व सेवेचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की ते सरकारच्या कार्याचा सकारात्मक प्रचार करीत आहेत आणि त्यामध्ये काही त्रुटी असल्यास त्यादेखील निदर्शनाला आणून देत आहेत.

प्रसारमाध्यमे "आत्मनिर्भर भारत" या मोहिमेला आकार देत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला ज्यामुळे “व्होकल फॉर लोकल” अधिक पाठबळ मिळत आहे. हा दृष्टीकोन अधिक व्यापक करण्याची गरज असल्यावर त्यांनी जोर दिला. भारताची स्थानिक उत्पादने जागतिक स्तरावर जात आहेत परंतु भारताचा आवाजही जागतिक स्तरावर पोहोचला पाहिजे याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

जग आता भारताचे म्हणणे अधिक लक्ष देऊन ऐकत आहेत असे ते म्हणाले. अशा परिस्थितीत भारतीय माध्यमही जागतिक दर्जाची होण्याची गरज आहे. भारतीय संस्थांनीही आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध साहित्य पुरस्कार दिले पाहिजेत.

कर्पूर चंद्र कुलिश यांच्या सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार सुरू केल्याबद्दल पंतप्रधानांनी पत्रिका समूहाचे अभिनंदन केले.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya