पंतप्रधान बुधवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२२: देशात कोरोना महारोगराईचा प्रकोप वाढत आहे. सातत्याने वाढत जाणारी कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी, २३ सप्टेंबरला राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेऊन प्रत्येक राज्यातील कोरोना स्थिती जाणून घेणार आहेत. या बैठकीत सात राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांसह इतर काही राज्यातील मुख्यमंत्री बैठकीतून कोरोनावर आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच वर्तमान स्थिती संबंधी पंतप्रधानांना माहिती देतील. महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. अशात तामिळनाडू, कर्नाटक, आंधप्रदेशातील मुख्यमंत्रीदेखील या बैठकीत सहभागी असतील, अशी माहिती समोर आली आहे.

कोरोना विषाणूचे संकट सुरु झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांसोबत नियमित बैठका घेऊन राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे, अश्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान बैठकीतून चर्चा करीत त्यांचे प्रश्न, समस्या ऐकूण घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापूर्वी कोरोना संदर्भातील आढावा बैठक ११ ऑगस्ट रोजी झाली होती. या बैठकीत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या १० राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते. यात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश होता.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya